भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला अंधश्रद्धेच्या जटेतून मुक्त करण्याची अनोखी भेट!
पुणे : भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीला भेट देण्याऐवजी बहिणीनेच भावाला अंधश्रद्धेतून मुक्त होण्याची अनमोल भेट दिल्याचा अनोखा प्रसंग सोलापूर जिल्ह्यात घडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून पंढरपूर, माढा तालुक्यातील केवड आणि माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील तीन महिलांच्या डोक्यातील जटा काढण्यात आल्या. समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. समितीचे हे अनुक्रमे ३५०, ३५१ आणि ३५२ वे जट निर्मूलन ठरले.
१० नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील आलिशा शेख यांच्या डोक्यातील गेल्या चार वर्षांपासून असलेली जट काढण्यात आली. गेल्या वर्षभरापासून त्यांचे समुपदेशन सुरू होते. सातत्यपूर्ण संवाद आणि प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना जट काढण्यासाठी तयार करण्यात यश आले.
११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी माढा तालुक्यातील केवड येथे ७६ वर्षीय महिलेच्या डोक्यातील गेल्या दीड वर्षांपासून असलेली जट काढण्यात आली. विशेष म्हणजे, भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीने अंधश्रद्धेतून मुक्त व्हावे, अशी तिच्या भावाची इच्छा होती. जट काढल्यानंतर देशमुख काकांनी भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “भाऊबीजेच्या दिवशी माझ्या बहिणीने मला खूप मोठी भेट दिली आहे. स्वतःच्या डोक्यातील जट काढण्याची परवानगी देऊन तिने मला भाऊबीजेची अनमोल भेट दिली आहे.”
त्यानंतर माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील महिलेच्या डोक्यातील गेल्या २० वर्षांपासून असलेली जट काढण्यात आली. हे समितीचे ३५२ वे जट निर्मूलन ठरले.
या तिन्ही मोहिमांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी पुढाकार घेतला. यावेळी दत्तात्रय जाधव, इंद्रजीत जाधव, जया जाधव आणि अॅड. सोहम व्होरा उपस्थित होते.
जट म्हणजे देवीचा प्रसाद किंवा दैवी चमत्कार नसून केसांची गुंतागुंत आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे अनेक महिला वर्षानुवर्षे जट ठेवतात. जट निर्मूलन म्हणजे केवळ केस मोकळे करणे नसून मनातील भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे, असे नंदिनी जाधव यांनी सांगितले.
महिलांनी कोणत्याही धार्मिक भीतीला बळी न पडता स्वतःच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा विचार करावा. जट ही दैवी देणगी नसून केसांची गुंतागुंत आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्यावे. समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून जट निर्मूलनासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
