Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे  : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि समाजसुधारणेचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना ‘धरती आबा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता व दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे तसेच आधारकार्ड व इतर शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी भूमिहीन ८६३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात तालुक्यांतील आणखी ६४० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले आणि ११ हजार १७० रेशनकार्ड वितरित करण्यात आले आहेत. तसेच ४ हजार २०० नागरिकांना आयुष्मान कार्ड, ९७१ नागरिकांना जनधन बँक खाते आणि ४८५ नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातही सेवा सप्ताहाचे आयोजन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत बीड जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिवस सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात शासकीय योजनांचा प्रसार, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वडवणी तालुक्यातील कुप्पा व खलवट निमगाव येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन एलईडीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना ऐकविण्याचे नियोजन आहे. शिरूर कासार येथे आधारकार्ड व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिर, तर वडवणी व आष्टी-पाटोदा तालुक्यांतील आदिवासीबहुल गावांमध्ये आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या दोन वर्षांत आदिवासी विकास विभागाने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पवित्र पोर्टलद्वारे २ हजार ५०० हून अधिक शिक्षकांची पारदर्शक भरती करण्यात आली असून ३ हजारांहून अधिक कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सेमी-इंग्रजी व सीबीएसई पॅटर्न, शाळांमध्ये क्रीडा, कला व संगीत शिक्षकांची नियुक्ती तसेच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आश्रमशाळांमध्ये पहिल्यांदाच परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेच्या भत्त्यात ३३ टक्के वाढ करून या योजनेचा विस्तार ग्रामीण भागातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘वीर राघोजी भांगरे’ शिष्यवृत्ती, महिलांसाठी ‘राणी दुर्गावती योजना’ आणि युवकांसाठी ‘विशेष उद्योजकता विकास योजना’ सुरू करण्यात आली आहे.

कोलाम, कातकरी, माडिया व पारधी जमातींसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये भोजन व्यवस्था (मेस सुविधा) पुन्हा सुरू करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply