Wednesday, November 11, 2026
ENTERTAINMENTLatest News

अॅक्शन, रोमान्स आणि संगीताचा धमाका! ‘गनमास्टर G9’ ठरणार संपूर्ण मनोरंजनाची मेजवानी

पुण्यात इम्रान हाश्मी, जेनेलिया देशमुख, अपारशक्ती खुराना यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च

अॅक्शन, थरार, रोमान्स, विनोद आणि दमदार संगीत अशा मनोरंजनाच्या सर्व घटकांची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘गनमास्टर G9’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा बुधवारी पुण्यात पार पडला. या सोहळ्याला अभिनेता इम्रान हाश्मी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, अभिनेता अपारशक्ती खुराना, अभिषेक सिंह, दिग्दर्शक आदित्य दत्त आणि निर्माते दीपक मुकुट उपस्थित होते.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त गनफाइट्स, हँड-टू-हँड कॉम्बॅट, थरारक अॅक्शन सीक्वेन्स, रोमान्स आणि संगीताची झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, इम्रान हाश्मी एका नव्या आणि दमदार अॅक्शन अवतारात प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याच्या यापूर्वीच्या भूमिकांपेक्षा हा अंदाज निश्चितच वेगळा ठरणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला, “मी यापूर्वी अनेकदा अशा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत ज्या धोकादायक परिस्थितीत सापडतात. मात्र, ‘गनमास्टर G9’मध्ये मी केवळ धोक्याला सामोरा जात नाही, तर थेट अॅक्शनच्या केंद्रस्थानी आहे. हँड-टू-हँड कॉम्बॅट, गन सीक्वेन्स आणि स्टंट्ससाठी वेगळ्या प्रकारच्या तयारीची आवश्यकता होती. यासाठी मी मार्शल आर्ट्स, गन शूटिंग आणि शारीरिक प्रशिक्षणावर विशेष मेहनत घेतली. प्रेक्षकांना माझा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळावा, हीच माझी इच्छा होती.”

इम्रान हाश्मीबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणारी जेनेलिया देशमुख म्हणाली, “या चित्रपटाची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो स्वतःला एका विशिष्ट जॉनरपुरता मर्यादित ठेवत नाही. यात अॅक्शन आहे, रोमान्स आहे, विनोद आहे, संगीत आहे आणि भावनाही आहेत. प्रेक्षकांचे वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करण्याची संधी अशा चित्रपटातून मिळते. इम्रानसोबत पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभवही माझ्यासाठी खास होता. ट्रेलर ही आपण तयार केलेल्या मनोरंजक विश्वाची केवळ एक झलक आहे.”

अभिनेता अपारशक्ती खुराना म्हणाला, “जेव्हा एखादा चित्रपट इतक्या मोठ्या अॅक्शन आणि भव्यतेचे आश्वासन देतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तिरेखेने त्यात आपले वेगळेपण दाखवणे महत्त्वाचे असते. ‘गनमास्टर G9’मध्ये अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा आणि प्रसंग आहेत. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना एकत्र अनुभवायला आवडतील असे अनेक भव्य क्षण या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.”

दिग्दर्शक आदित्य दत्त यांनी सांगितले, “इम्रानला अशा एका विश्वात पुन्हा घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे, जे त्याने गेल्या अनेक दशकांत या स्वरूपात अनुभवलेले नाही. एक भव्य, कमर्शियल अॅक्शन एंटरटेनर! इम्रानचा असा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, जो बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि दमदार संगीत या माझ्या चित्रपटनिर्मितीतील नेहमीच महत्त्वाच्या राहिलेल्या दोन गोष्टींचा यात सुरेख मिलाफ आहे. इम्रानसोबतचा आमचा प्रवास पुन्हा अनुभवणे आनंददायी आहे; मात्र, आजच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन, धमाकेदार आणि खऱ्या अर्थाने मनोरंजक सादर करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

निर्माते दीपक मुकुट म्हणाले, “आम्हाला ‘गनमास्टर G9’ हा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखा भव्य मनोरंजक चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी चित्रपटातील अॅक्शन, लोकेशन्स आणि एकूणच निर्मितीला आवश्यक ती भव्यता देण्यात आली आहे. इम्रानचा नवा अॅक्शन अवतार, दमदार संगीत आणि मनोरंजनाचे सर्व घटक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

इम्रान हाश्मी, जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना यांच्यासह अभिषेक सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट, हुनर मुकुट आणि संगीता अहिर यांनी केली आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. हा अॅक्शन-रोमान्सपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला हिमेश रेशमिया यांचे संगीत लाभले आहे.

‘गनमास्टर G9’ हा SRE Studios LLP यांचा निर्मिती उपक्रम असून, पेन मरुधर हे चित्रपटाचे संपूर्ण भारतातील वितरक आहेत, तर परदेशातील वितरणाची जबाबदारी फार्स फिल्म्स यांच्याकडे आहे.

Leave a Reply