“भाऊबीजेला आमची ३५-४० जणांची मोठी फॅमिली एकत्र येते आणि रात्रभर धमाल करते!” – प्राप्ती रेडकर
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याचा सण. लहानपणी मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल, पहाटे उठून फटाके फोडण्याची मजा, घराघरांतून मिळणारा फराळ आणि कुटुंबीयांसोबत साजरे केलेले खास क्षण या सगळ्यामुळे दिवाळीच्या आठवणी कायम मनात राहतात. प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणींचा एक वेगळा गोडवा असतो. झी मराठीवरील *‘सावळ्याची जणू सावली’* या मालिकेत *सावली* ची भूमिका साकारणारी *अभिनेत्री प्राप्ती रेडकर* हिने तिच्या बालपणीच्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी, फराळाविषयीचं प्रेम आणि कुटुंबीयांसोबत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीबद्दलच्या खास गोष्टी सांगितल्या.

प्राप्ती सांगते, “लहानपणीची दिवाळी मी माझ्या नानीकडे साजरी करायचे. माझी नानी चाळीत राहते. तिथे खूप मजा असायची. चाळीतले सण किती छान साजरे होतात आणि सगळे मिळून किती धमाल करतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिथे चाळीतल्या माझ्या मित्रमैत्रिणींसोबत माझी एक पैज असायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानासाठी जो सगळ्यात आधी उठेल आणि पहिला फटाका फोडेल तो जिंकेल, अशी आमची स्पर्धा असायची. त्यानंतर आम्ही सगळे एकत्र फराळ खायचो, एकमेकांच्या घरी जायचो आणि आपापल्या घरचा फराळ एकमेकांना द्यायचो. अशा प्रकारे माझी दिवाळी खूप धमाल असायची. मी लहानपणी खूप फटाके फोडले आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून मी फटाके फोडणं बंद केलं आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आता मला स्वतःलाच फटाके फोडणं योग्य वाटत नाही. अर्थात, मी कोणाला फटाके फोडण्यापासून थांबवत नाही. चाळीत आम्ही सगळे मिळून आकाशकंदील बनवायचो. माझं संपूर्ण कुटुंब आणि बिल्डिंगमधले माझे मित्रमैत्रिणी असे सगळे मिळून मरीन ड्राइव्हला जायचो, तो अनुभव खूप वेगळा होता.
फराळ म्हणजे माझ्यासाठी एक भावना आहे. दिवाळी संपल्यानंतरही पुढचे पाच-सहा महिने मी फराळ खातच असते. मला फराळ खूप आवडतो. चकली, शंकरपाळी, विशेषतः खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी मला खूप आवडतात. माझ्या मम्मीच्या हातचे बेसनाचे लाडू तर मला फार आवडतात. येतो.

फराळाच्या बाबतीत आमच्या बिल्डिंगमध्ये एक खास गोष्ट केली जाते. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबांतील अनेकांना फराळ आवडतो, पण त्यांच्या घरी तो बनवला जात नाही. त्यामुळे आम्ही दरवर्षी एक खास कार्यक्रम ठेवतो. सगळेजण आपापल्या घरून फराळाचे पदार्थ आणतात आणि एकत्रितपणे बुफे तयार करतो. त्यांना आवर्जून बोलावतो. ते सगळे येतात आणि फराळाचा आनंद घेतात. अशा प्रकारे आम्ही सगळे मिळून वेगवेगळे सण साजरे करतो. मला विचाराल तर फराळात माझे सगळ्यात आवडते पदार्थ म्हणजे शंकरपाळी आणि चकली. दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदीही महत्त्वाची असते. मी दरवर्षी आवर्जून नवीन कपडे खरेदी करते. बऱ्याचदा माझी मम्मीच माझे कपडे डिझाईन करते किंवा शिवून देते. त्यामुळे नवीन कपड्यांची मजा काही वेगळीच असते.
माझ्या पप्पांच्या बाजूचे आमचे कुटुंब जवळपास ३५-४० जणांचं आहे. आमचं खूप मोठं कुटुंब आहे. हे सगळेजण दिवाळीत आमच्या घरी एकत्र येतात आणि आम्ही भाऊबीज साजरी करतो. त्या दिवशी खूप धमाल असते. आमची कराओके नाईट असते, डान्स करतो, अंताक्षरी खेळतो. कधी कधी रात्रभर अंताक्षरी आणि डंब शराड्स खेळत बसतो. हे सगळे क्षण आम्ही खूप एन्जॉय करतो.”

*प्राप्तीच्या दिवाळीच्या आठवणींमधून चाळीतल्या एकोप्याचं, एकमेकांसोबत आनंद वाटून घेण्याचं आणि सर्वांनी मिळून सण साजरा करण्याचं सुंदर चित्र समोर येतं. यंदाही प्राप्ती आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत दिवाळीचा आनंद घेत असून, तिच्यासाठी हा सण म्हणजे प्रेम, एकत्र येणं आणि भरपूर धमाल करण्याची खास संधी आहे.*
