फटाक्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; वडिलांना वाचवताना २१ वर्षीय तरुणीच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार
पुणे : दिवाळीत फटाके वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचा भयंकर शेवट झाल्याची घटना नाना पेठ परिसरात घडली आहे. रिक्षाचे चाक फटाक्यावरून गेल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाला पुन्हा लक्ष्य करून मारहाण करण्यात आली. वडिलांना हल्लेखोरांच्या तावडीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या २१ वर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
आकांक्षा नितीन साळवे (वय २१) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिचे वडील नितीन गिरधारी साळवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विनायक अतिश कांबळे (वय २६) आणि आर्यन विजय शिंदे (वय १८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर संदेश संजय जाधव (वय ३०) आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे रिक्षा चालवतात. दिवाळीनिमित्त नातेवाईकांची भेट घेऊन ते पत्नी आणि मुलीसह घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या इमारतीत राहणारे संजय जाधव आणि त्यांचा जावई आकाश ऊर्फ ऋषी उबाळे रस्त्यावर फटाके फोडत होते. याचदरम्यान उबाळे याने लावलेल्या फटाक्यावरून साळवे यांच्या रिक्षाचे चाक गेले. याचा राग आल्याने उबाळे याने साळवे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मात्र, काही वेळाने वाद निवळल्याने दोन्ही बाजूचे लोक घरी निघून गेले.
दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास साळवे हे घराजवळील होप हॉस्पिटल परिसरात उभे असताना संदेश जाधव आणि त्याचे तीन मित्र तेथे आले. साळवे यांना पाहताच संदेशने आपल्या मित्रांना फटाक्यांवरून त्यांच्याशी झालेल्या जुन्या वादाची आठवण करून दिली. त्यानंतर चौघांनी साळवे यांना घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली.
वडिलांना मारहाण होत असल्याचे समजताच त्यांची पत्नी, दोन मुली आणि भाचा मदतीसाठी धावले. यावेळी आरोपी विनायक कांबळे याने धारदार शस्त्र बाहेर काढून साळवे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या आकांक्षाच्या डोक्याला हा वार लागला. गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती घटनास्थळीच बेशुद्ध पडली.
आकांक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी आकांक्षाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
