Thursday, November 12, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून शरद पवार गटात चार मतप्रवाह; सत्तेत जाण्यावर नेत्यांमध्ये मतभेद


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच शरद पवार गटातच या मुद्द्यावरून मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करून महायुती सरकारमध्ये सहभागी व्हायचे की स्वतंत्र गट म्हणून सत्तेत जायचे, यावर पक्षातील नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयावरून शरद पवार गटात तब्बल चार गट पडल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील अनेक ज्येष्ठ आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने आहेत. अजित पवार हयात असताना या संदर्भात चर्चा सुरू होती. त्यावेळी विलिनीकरणाच्या अनुषंगाने तब्बल १७ बैठका झाल्याची माहिती आहे. मात्र, त्या प्रक्रियेत शरद पवार सक्रिय सहभागी नसतील, अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्याच्या चर्चेतही एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयप्रक्रियेत शरद पवारांचा थेट सहभाग नसेल, अशी चर्चा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मात्र, पक्षातील सर्वच नेत्यांचे विलिनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत एकमत नाही. काही ज्येष्ठ नेत्यांना दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करून सत्तेत जाणे योग्य वाटत आहे. तर काही आमदारांचे मत वेगळे आहे. विलिनीकरण करण्याऐवजी स्वतंत्र गटाचे अस्तित्व कायम ठेवून सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा पर्याय काही नेत्यांकडून पुढे केला जात आहे.
आमदार रोहित पवार हे सत्तेत सहभागी होण्याच्या भूमिकेला विरोध करत असल्याची माहिती आहे. पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व आणि आतापर्यंत घेतलेली भूमिका लक्षात घेता सत्तेत जाण्याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे समजते. दुसरीकडे, आमदार रोहित पाटील यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्वतःची ठाम भूमिका जाहीर केलेली नाही. पक्ष नेतृत्व जो अंतिम निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप विलिनीकरण किंवा सत्तेत सहभागी होण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. तसेच आमदारांशी या विषयावर सविस्तर चर्चा झालेली नसल्याची माहिती आहे.
सुप्रिया सुळे सध्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर शरद पवार मुंबईत आहेत. दिल्ली दौऱ्यात सुप्रिया सुळे भाजपच्या नेत्यांची भेट घेणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटीगाठी आणि पडद्यामागील चर्चांमुळे विलिनीकरणाच्या शक्यतेला पुन्हा वेग आला आहे. मात्र, विलिनीकरण, स्वतंत्र गट म्हणून सत्तेत सहभाग की विरोधी पक्षातच कायम राहणे, या पर्यायांवर शरद पवार गटात एकमत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीचे चित्र अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply