Thursday, November 12, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला वेग; सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीतही राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची माहिती

मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नवा खळबळजनक दावा केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असे लोंढे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास त्यांची आगामी राजकीय भूमिका काय असेल, याबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत प्रस्ताव अद्याप शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याचे सूत्रांकडून समजते. अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत झालेल्या चर्चा आणि निर्णयांना पुढे कसे न्यायचे, यावर सध्या पक्षांतर्गत विचारमंथन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांची भूमिका आणि आगामी राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाडव्याच्या दिवशी तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दाही चर्चेला आल्याचे समजते.

या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाच्या शक्यतेला स्पष्ट नकार दिलेला नाही. ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील,’ असे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची शक्यता अद्याप कायम असल्याचे संकेत मिळत असून, राज्याच्या राजकारणात पुढे कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply