Monday, June 1, 2026
Latest NewsLIFESTYLE

आजपासून जहांगीर आर्ट गॅलरीत “सृजनानुभूती ” हे जितेंद्र दिवटे यांचे चित्र प्रदर्शन

सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र दिवटे ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे “सृजनानुभूती”    हे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे १९ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे ऍक्रिलिक रंगसंगतीचा वापर करून आपल्या कलात्मक शैलीत बनविलेली आहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने विविध मंदिरे, प्रार्थनास्थळे, त्यातील धार्मिक वातावरण व संकल्पना तसेच ऐतिहासिक वास्तू, त्यांची रचनात्मक शैली व तेथील रूढी, परंपरा आणि त्या सामाजिक जीवनाचे अनेक पैलू ह्यावर आधारित आपली  चित्रे रसिकांपुढे सादर केली आहेत.

 जितेंद्र दिवटे ह्यांचे कलाशिक्षण L.S. रहेजा स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले. तेथे ते अंतिम परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुणवत्ते नुसार ७ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी काळा घोडा असोसिएशन, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग, मुंबई येथे २००५ साली एकल प्रदर्शनात आपली चित्रे मांडली व नंतर २००८  साली साहिल कलादालन, मुंबई येथे एकल प्रदर्शनात आपल्या चित्रांचे सादरीकरण केले. २०११ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत समुह प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच २००३ साली नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई येथे, २००६ साली काळा घोडा असोसिएशन, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग, मुंबई  येथे, २०१० साली, २०१६ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी चे वार्षिक प्रदर्शन, २०१७ मध्ये विस्मय मेट्रो कलादालन बंगलोर आणि चित्रकला परिषथ बंगलोर येथे सामूहिक कलाप्रदर्शनात भाग घेऊन आपली कलारसिकांपुढे सादर केली. त्यांच्या चित्रांना नेहमी रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जलरंगातील चित्रांसाठी त्यांना IWS INDIA तर्फे २०१७ साली, IWA  बांगलादेश तर्फे २०१८ मध्ये व IWS रशिया तर्फे २०२१ साली पुरस्कृत करण्यात आले आहे.

 प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी रसिकांपुढे सादर केलेली चित्रे प्रामुख्याने भारतातील विविध जागी असणारी मंदिरे तेथील प्रार्थनास्थळे,  धार्मिक वातावरण व रूढी परंपरा जपणारी वैशिष्ट्ये, ऐतिहासिक वास्तूंची रचनात्मक वैशिष्ट्ये आणि संरचनात्मक शैलीतील खास गुण प्रकर्षानं दर्शवितात. विविध भूमितीय आकार आणि त्यांच्या कलात्मक व रचनात्मक संयोगातून त्यांनी आपल्या चित्रांमधून अपेक्षित दृष्यपरिणाम साकारला आहे. सकाळी मंदिरावरील पडणारा प्रकाश व त्यामुळे तेजांकीत होणारे वातावरण, दुपारच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी मंदिरावरील पडणारा प्रकाश त्यातून त्यांनी साधलेली दृश्यमान अशी छायाप्रकाशाची वैशिष्ट्ये, सावल्या, पडछाया वगैरेचा उत्तम दृष्यपरिणाम आपल्या चित्रांमध्ये साकारला आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading