जहांगीर आर्ट गॅलरीत मैत्री शाह यांचे चित्र प्रदर्शन आजपासून
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार मैत्री शाह यांचे “विंडोज ऑफ इनर एक्स्प्रेशन्स ” हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. मैत्री शाह या गेली दोन दशके चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती त्यामुळे अगदी वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी जपान येथील कानागावा बिनाले मध्ये सहभाग नोंदवला आणि तिथे त्या रजत पदकाच्या मानकरी ठरल्या. पुढे त्यांनी चित्रकलेतच उच्च शिक्षण घेतले. मैत्री यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. ४० अंडर ४० या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांची कला क्षेत्रामध्ये निवड झाली आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी टॉप १०० विमेन इंडिया हा पुरस्कार त्यांना २०२३ मध्ये जाहीर झाला आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते मैत्री यांना “पिलर्स ऑफ महाराष्ट्र” हा पुरस्कार मिळाला आहे. प्रख्यात अशा शंकर्स आर्ट स्पर्धेमध्ये त्यांना रजत पदक मिळाले. टोक्यो, जपान येथील “ग्लोबल पीस अँड एन्व्हायरमेंट अवॉर्ड” मैत्री यांना मिळाले आहे. त्याचबरोबर ललित कला परिषद (विशाखापट्टणम), चित्रकला परिषद (अमलापुरम) अशा महत्त्वाच्या संस्थांनी त्यांना चित्रकला क्षेत्रातील योगदानासाठी गौरवले आहे.

जपान, पोलंड, मॉरीशस, अहमदाबादनी गुफा यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मैत्री यांची चित्र प्रदर्शने आयोजित झाली आहेत. त्याचबरोबर जयपूर, वडोदरा, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता या शहरांमध्ये त्यांची चित्र प्रदर्शने आयोजित झाली आहेत.
मैत्री यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ती रसिकांशी यशस्वीपणे संवाद साधतात. मैत्री या तैलरंग, चारकोल, अॅक्रेलिक अशा विविध माध्यमांचा एकाच वेळी कॅनव्हास वर यशस्वीपणे वापर करून चित्रांमध्ये नाट्यमय परिणाम साध्य करतात. मैत्री यांची अनोखी चित्रशैली मानवी भावभावनांना उत्स्फूर्तपणे कॅनव्हासवर उतरवते. “स्त्री” ही मैत्री यांच्या चित्रांच्या केंद्रस्थानी आहे. स्त्रीच्या जीवनातील विविध छटा या चित्र मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतात.
मैत्री यांचे ब्रश स्ट्रोक्स हे उत्स्फूर्त आहेत. त्यामुळे एकाच वेळी सळसळते चैतन्य आणि दुर्दम्य आशावाद यांचे दर्शन मैत्री यांच्या चित्रातून घडते. मैत्री यांचे प्रस्तुत “विंडोज ऑफ इनर एक्स्प्रेशन्स” हे प्रदर्शन प्रतिकांमधून मानवी भावनांचे दर्शन रसिकांना घडवते. या प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती ही मानवी मनोव्यापाराचे दर्शन घडवणारी “खिडकी”च आहे. या खिडकीतून मानवी सुखदुःख, भावविश्व, विचारांचे प्रतिबिंब यांचे दर्शन रसिकांना घडते. प्रस्तुत प्रदर्शन हे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.
