Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALSportsTOP NEWS

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकमधून भारतासाठी पदके आणावीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची अपेक्षा

 

चेन्नई : तामिळनाडू सरकारच्या वतीने खेलो इंडिया स्पर्धेचे दार्जेदार आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या गेलेल्या खेलो इंडियातून दर्जेदार खेळाडू तयार होत आहेत. महाराष्ट्राच्या संघाने यावेळी देखील चांगली कामगिरी केली आहे. याबरोबरीने विविध राज्यातील खेळाडूंनी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना भारतासाठी पदके आणावीत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.

५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदके मिळवून गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविताना सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यावेळी बोलत होते. यावेळी तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टाॅलिन यांच्यासह तामिळनाडू राज्याचे अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकारी तथा खेळाडू उपस्थित होते.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टाॅलिन यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राचे पथक प्रमुख तथा क्रीडा उपसंचालक विजय संतान, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, उदय पवार, खेळाडू तनिष्क जाधव, अदिती हेगडे यांनी विजेतेपदाचा करंडक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

महाराष्ट्राचे हे चौथे विजेतपद

सन २०१८ साली दिल्ली येथून खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१९ साली पुणे येथे झालेल्या स्पर्धेत व त्यानंतर २०२० साली आसाम येथे, आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २०२२  साली मध्य प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्राने मिळवले होते. यावर्षी  (२०२३) देखील सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राने विजेतपद मिळविले आहे.

 यजमान तामिळनाडू दुसऱ्या स्थानी

यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी एकूण ९८ पदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी ३५ सुवर्ण, २२ रौप्य व ४६ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची कमाई केली.

महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक पदके

महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ११ सुवर्ण, १० रौप्य व ६ कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकून पदक तालिकेमध्ये मोठा वाटा उचलला. त्या खालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदकांसह १७ पदके मिळाली, तर कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार सुवर्णपदकांसह १४ पदकांची कमाई झाली. अ‍ॅथलेटिक्समध्ये १२, तर वेटलिफ्टिंगमध्ये १३ पदके महाराष्ट्राने जिंकली. योगासनामध्ये महाराष्ट्राला ११ पदके मिळाली.

Leave a Reply