मसापमध्ये चिमुकल्यांचा चिवचिवाट
पुणे : एरवी कविसंमेलन, व्याख्याने, पारितोषिक वितरण, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद अशा कार्यक्रमांमुळे भरून जाणाऱ्या माधवराव पटवर्धन सभागृहाने चिमुकल्यांचा चिवचिवाट अनुभवला. निमित्त होते ते मसापच्या वा. गो. आपटे संदर्भ संशोधन ग्रंथालयाला मुलांनी भेट देण्याचे. एस. पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूलचे इयत्ता ८ वी चे १०० विद्यार्थी भेट देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत आले होते.
या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका ऋतुजा रिसबुड आणि शिक्षक ओंकार पवार होते. मुलांनी ग्रंथालय पाहून त्या संदर्भात मुलांच्या मनात असलेल्या शंका विचारल्या. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. वर्षा डाळिंबकर यांनी मुलांना ग्रंथालयाची माहिती दिली. मुलांना चरित्र, कथा, कादंबरी, लेख, समीक्षा, संदर्भ ग्रंथ या विषयीच्या पुस्तकांची माहिती, पुस्तके दाखवून देण्यात आली. मुलांनी उत्सुकतेने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृहात व तेथे लावलेली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची व ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांची छायाचित्रे पाहून माहिती विचारली. मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आणि पर्यवेक्षक सुप्रिया गद्रे यांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
