Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठी म्हणून मलाही घर नाकारले होते – पंकजा मुंडे

मुंबई : मुलुंडमध्ये एका मुलीला केवळ ती मराठी आहे म्हणून घर नाकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सर्व सामान्य जनतेमधून या प्रकारावर चीड व्यक्त केली जात आहे. तर या प्रकारामुळे राजकीय वर्तुळही ढवळून निघाले आहे. आता याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार जनतेसमोर मांडला आहे. पंकजा मुंडे यांचा व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, जेव्हा मला सरकारी घर सोडून नवीन घर घ्यायचे होते, तेव्हा मलाही हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला. मराठी लोकांना आम्ही घर देत नाही, असे मला सांगितले गेले, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, मी कोणत्याही एका भाषेची किंवा एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचे सौंदर्य प्रत्येक भाषेने, जातीने आणि धर्माने नटलेले आहे. मुंबई ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांचे स्वागत आहे. पण जर कोणी मराठी म्हणून घर देत नसेल, बिल्डिंगमध्ये प्रवेश नाकारत असेल तर ते दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला हे फार दुर्देवी आहे. या देशातील प्रत्येक राज्यात प्रत्येक भाषेच्या प्रत्येक राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची गरज काय हा माझा प्रश्न आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, एका मराठी मुलीची मी व्यथा पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादात मला पडायला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवादावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावे, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावे ठेवावी यात मी फार उडी घेत नाही. परंतु, एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती, इथे मराठी माणसाला घर देत नाही, किंवा मराठी माणसाला सोसायटीत राहण्याची परवानगी नाही. हे धक्कादायक आहे. या मुलीसोबत जो प्रकार झाला. तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading