fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या अप्रकाशित नाममुद्रेचे  प्रकाशन

पुणे: श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या अप्रकाशित नाममुद्रा आणि माहुली तीन नाही तर चार गडांचा मिळून बनलेला किल्ला असल्याची माहिती इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ञ राज मेमाणे यांनी संशोधन करुन शोधनिबंधातून सादर केले.
 श्रीदेवदेवेश्वर संस्थान सारसबाग व पर्वती पुणे यांच्या विद्यमाने आयोजित शोधनिबंध सभेत श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या नाममुद्रा प्रकाशित करीत त्यांनी संशोधन सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास तज्ञ मंदार लवाटे, श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत उपस्थित होते.
राज मेमाणे म्हणाले, पेशव्यांच्या घराण्यातील सर्वात दुर्दैवी पेशवा म्हणून नारायणराव पेशवे आपल्याला परिचित आहेत. पेशवाईतील अंतर्गत राजकारणातून त्यांचा ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात खून झाला. नारायणराव पेशवे पदावर असताना त्यांच्या मोडी पत्रांवर ‘श्री राजाराम नरपती हर्षनिधान नारायणराव बल्लाळ मुख्य प्रधान’ ही नाममुद्रा आढळून येते.
परंतु नारायणराव पेशवे पदावर बसण्याआधी एक नाममुद्रा वापरत असत. ती नाममुद्रा पुणे पुरालेखागारातील रांजणगावाच्या कागदपत्रांतून आढळून आली. रांजणगावातील वतनदारीच्या तंट्याचा निवाडा नारायणरावांनी केला होता त्या पत्रावर ही मुद्रा आढळून आली आहे. १३ मे इसवी सन १७६६ या दिवसाचे हे पत्र असून त्यावर नारायणराव पेशव्यांची आजवर अपरिचित असलेली नाममुद्रा आढळून आली आहे. त्यातील मजकूर  “श्री राजाराम चरणी तत्पर नारायणराव बल्लाळ निरंतर” हा असून वयाच्या केवळ अकराव्या वर्षी नारायण पेशवे यांनी हा निवाडा केला आहे.
त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड जवळील माहुली किल्ला तीन गडांचा मिळून ओळखला जातो. भंडारदुर्ग,  पळसगड आणि माहुली. परंतु पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रांमधील माहितीनुसार हा किल्ला तीन नव्हे तर चार गडांचा मिळून बनलेला आहे. याच चौथ्या गडाचे नाव मोडी कागदपत्रांतून प्रतापगड असे आढळून आले आहे.
इसवी सन १७५० सालानंतरच्या जवळपास सर्वच कागदपत्रांतून किल्ल्याचे चार भाग असल्याचे उल्लेख सापडतात ते चार भाग म्हणजे भंडारदुर्ग पळसगड, माहुली आणि प्रतापगड. त्यापैकी प्रतापगडावर बुरुज, सदर, तारांगण, गढी इत्यादी इमारती असल्याचे उल्लेख मोडी कागदपत्रांतून आढळून येत. माहुली किल्ल्यावर नेमका कोणता भाग प्रतापगड असू शकतो याचा शोध घेण्याचे काम सध्या चालू असल्याचे राज मेमाणे यांनी सांगितले.
मंदार लवाटे म्हणाले, आज नारायणराव पेशवे यांची हत्या होऊन बरोबर २५० वर्ष पूर्ण झाली आहेत. इतिहासात असा उल्लेख आढळतो की माधवराव यांनी नारायणरावांना वयाच्या १३ व्या वर्षी फडावर यायला सांगितले. परंतु ११ व्या वर्षी त्यांना फडावर पाठवून बखलाशी करायला सांगितल्याचे पुरावे मेमाणे यांनी मिळवलेल्या या शिक्यामुळे लक्षात आले आहेत. खूप कमी लोक असे आहेत जे सखोल अभ्यास करून शोध निबंध सादर करतात. परंतु मेमाणे यांच्यासारखी दुर्मिळ कागदपत्रांचाअभ्यास करणारे आणि उत्तम संस्कृत, मोडी जाणणारे अभ्यासक कमी आहेत.  त्यांचे हे शोध निबंध पुढील अभ्यासकांसाठी नक्कीच उपयोगी पडतील.

Leave a Reply

%d bloggers like this: