टाटा ऑटोकॉम्पची स्कोडा ग्रुपसोबत धोरणात्मक भागीदारी
पुणे : टाटा ऑटोकॉम्प या भारतातील एका आघाडीच्या ऑटो कम्पोनंट कंपनीने स्कोडा ग्रुप या सार्वजनिक वाहतुकीसाठी सुटे भाग व वाहने बनवणाऱ्या आघाडीच्या युरोपियन कंपनीसोबत एक समझोता करार केला आहे. भारतात वेगाने विकसित होत असलेल्या रेल्वे व सार्वजनिक गतिशीलता बाजारपेठेसाठी सुट्या भागांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भागीदारी व्यवसायासाठी फ्रेमवर्क या करारातून तयार करण्यात आले आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांना यंत्रणा व सुटे भाग पुरवण्यात टाटा ऑटोकॉम्प आघाडीवर आहे. या भागीदारीमुळे टाटा ऑटोकॉम्पचा पोर्टफोलिओ अजून जास्त वैविध्यपूर्ण होईल, तसेच रेल्वे, मेट्रो व बस विभागात त्यांच्या क्षमता अधिक मजबूत होतील. भारतात रेल्वे, मेट्रो आणि बस विभागाला सेवा पुरवण्यासाठी गतिशीलता सुविधांमध्ये किफायतशीर खर्चात पर्यावरणानुकूल नावीन्य घडवून आणणे टाटा ऑटोकॉम्पचे उद्दिष्ट आहे.
टाटा ऑटोकॉम्पचे चेअरमन अरविंद गोयल यांनी यावेळी सांगितले, “आपल्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात टाटा ऑटोकॉम्प नेहमीच आघाडीवर असते. स्कोडा ग्रुपसोबतच्या सहयोगामुळे भारतीय रेल्वे, मेट्रो आणि बस बाजारपेठेसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रिकल साधने व सुटे भाग पुरवून आमचे स्थान अजून जास्त मजबूत करता येईल. रेल्वेसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीसह जागतिक बाजारपेठांना सेवा पुरवण्यात सतत कार्यरत असलेली कंपनी स्कोडा ग्रुपसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.”
परदेशी बाजारपेठांमध्ये स्कोडा ग्रुपचे स्थान मजबूत करणे आणि युरोपच्या बाहेर कंपनीचा विस्तार करणे हे स्कोडा ग्रुपच्या व्यवसाय धोरणाचे एक उद्दिष्ट आहे. उद्यमशीलतेच्या प्रदीर्घ परंपरेचा वारसा पुढे चालवत असलेल्या, अतिशय मानांकित भारतीय कंपनी टाटा ऑटोकॉम्पसोबत भागीदारी करून सहयोगात्मक लाभ प्रदान करण्याच्या भारतातील संधीचा उपयोग करून घेणे आणि व्यवसाय विकासाचा वेग वाढवणे हा स्कोडा ग्रुपचा उद्देश आहे.
स्कोडा ग्रुपचे प्रेसिडेंट – कम्पोनंट्स अँड बस मोबिलिटी पेट्र नोवोत्नी यांनी सांगितले, “टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्ससोबत आमची भागीदारी हा भारतीय रेल्वे आणि बस सार्वजनिक गतिशीलता बाजारपेठेत प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. भारतात उपलब्ध असलेल्या विपुल संधी, क्षमता, येथील कुशल मनुष्यबळ आणि बाजारपेठेतील मागणीचा प्रचंड ओघ या सर्व बाबी आमच्या समूहाच्या वृद्धी धोरणाला अतिशय अनुकूल आहेत. आम्ही दोन्ही कंपन्या मिळून नवनवीन संधींचा शोध व लाभ घेऊ, भारतीय रेल्वे उद्योगाच्या नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवासुविधा निर्माण करू.”
इलेक्ट्रिकल साधने व सुटे भाग यांचा विकास आणि निर्मिती हा स्कोडा ग्रुपचा एक प्रमुख पाया आहे. स्वतःची उत्पादने पुरवण्याबरोबरीनेच रेल आणि शहरी वाहतूक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा देखील स्कोडा ग्रुपचा उद्देश आहे. उच्च विश्वसनीयता, सुरक्षितता, क्षमता, ऊर्जेचा कमी वापर, दणकटपणा, कमी लाईफसायकल खर्च आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरकता यासारख्या प्रमुख आवश्यकता पूर्ण करतील असे सुटे भाग ही कंपनी डिझाईन व तयार करते. भारतीय रेल्वे बाजारपेठेविषयीची टाटा ऑटोकॉम्पची सखोल समज, या बाजारपेठेला उत्पादने, सेवा पुरवण्याची त्यांची नैपुण्ये आणि ‘वंदे भारत‘ ट्रेन प्रकल्पातील त्यांचे लक्षणीय योगदान यांचा खूप मोठा फायदा या भागीदारीला मिळणार आहे. परस्पर सहयोगातून एक समृद्ध, दीर्घकाळपर्यंत यशस्वीपणे टिकून राहील अशी भागीदारी करून तिचा प्रभाव सातत्याने वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.