तलाठी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यांमुळे नव्याने परीक्षा घेण्यात यावी -शिवसेना
पुणे: महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी पदासाठी परीक्षा सुरू आहे. त्यासाठी जवळजवळ दहा लाख विद्यार्थ्यांनी 900 रुपये शुल्क भरून परिक्षेचे फॉर्म भरले आहेत. ज्या कंपनीला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले, त्या कंपनीने दहा लाख विद्यार्थ्यांकडून करोडो रूपये घेउन देखील कंपनीला परीक्षा योग्य पद्धतीने घेता येत नाहीत, अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र भरातून येत आहेत. त्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहेत. कॉपीचे प्रकार देखील झाल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले आहेच, यामुळे सदर परीक्षेचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ स्वरूपात झाले आहे. अथवा जाणीवपूर्वक भ्रष्टाचाराच्या हेतूने परीक्षांमध्ये घोळ करण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी सर्वर अचानक बंद झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वेळेस पुन्हा परिक्षा परवानगी देण्यात आली. अशा पद्धतीने परीक्षेची वेळ बदलणे ही त्या विद्यार्थ्यांवर तसेच इतर विद्यार्थ्यांवर देखील अन्यायकारक आहे.
तलाठी भरती परिक्षा पदसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याच्या प्रगतीसाठी अनेक वर्षापासून अभ्यास करत आहेत. विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करताना लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावतात. घरापासून, आई-वडिलांपासून दूर राहून परिक्षेची तयारी करत असतात. एवढे केल्यानंतर देखील अशा स्पर्धा परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यास विद्यार्थ्यांचे मनोबल ढासळून त्याचे खच्चीकरण होईल. त्यामुळे अशा परीक्षा योग्य पद्धतीने कडक नियमाने कोणताही गोंधळ न होता पार पाडणे, ही सरकारची जबाबदारी आहे. तरी देखील योग्य पद्धतीने परीक्षा होत नाहीत. तसेच विद्यार्थी रिपोर्टिंग टाईम मध्ये येऊनही परिक्षेपासून वंचित राहण्याचे प्रकार देखील सदर परिक्षेत झाले आहेत. त्या संदर्भात लाखो विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी नोकरीसाठी हजारो रुपये शुल्क भरून परिक्षेची तयारी रात्रंदिवस अभ्यास करून करीत असतात.
या स्पर्धा परीक्षेतून आपल्या स्वतःचे भविष्य समृद्ध करण्याचा व आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करत असतात. ठेकेदारा मार्फत सरकारने विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये शुल्क उकळून त्यांची आर्थिक छळवणूक केली असून, परिक्षाही योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. एखादा जरी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तरी त्याच्या हक्कावर गदा येण्याचा व त्याच्यावर अन्याय होण्याचा प्रकार आहे. तलाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यामुळे त्याचे नियोजन पूर्णपणे फसले आहे. सदर परिक्षा रद्द करून जुन्या पद्धतीने म्हणजेच ओएमआर शीटचा वापर करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. लाखो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी सरकारला करोडो रूपये शुल्क म्हणून भरले आहेत. त्यामुळे त्यांची परीक्षा योग्य पद्धतीने होणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. सदरची ऑनलाईन परिक्षा त्वरित रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे वेळापत्रक तयार करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस OMR उत्तर पत्रिकेवर परिक्षा घेण्यात यावी. अन्यथा शिवसेना सदर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारेल.असा इशारा संजय मोरे यांनी दिला.
या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना अधिकारी राम थरकुडे, युवराज पारिख, निलेश जठार, समीर तुपे,भरत कुंभारकर, राजेंद्र बाबर, तानाजी लोणकर, नंदू येवले, राहुल जेकटे, अजय परदेशी, सूरज मोराळे, पराग थोरात, संजय व्हालेकर, रवी भोसले, राहुल शेडगे, शरद गुप्ते, मकरंद पेठकर, अजय कवडे उपस्थित होते.