अरविंद एज्युकेशन कनिष्ठ महाविद्यालयात परदेशी शिक्षणावर करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न
विद्यार्थी जीवनाचा टप्पा हा केवळ शैक्षणिक नाही, तर आपल्या आवडीनिवडी जोपासण्याचा टप्पा : डॉ. नरेश तरटे
पिंपरी : विद्यार्थी जीवनाचा टप्पा हा केवळ शैक्षणिक शिक्षणाचा भाग नसून, आपल्या आवडीनिवडी छंद जोपासण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन, योग्य मार्ग आणि ध्येय ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन कोरिया सायन्स अकादमी, बुसान येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नरेश तरटे यांनी केले.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. नरेश तरटे यांचे ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्राचार्या शीतल मोरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. तरटे यांनी स्वतःचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की कोणतीही गोष्ट साध्य करणे सोपे खूप आहे. मात्र, ती गोष्ट टिकवून ठेवणे, हे मोठे प्रयासाचे काम आहे. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन हा देखील एक महत्वाचा घटक आहे. भविष्यात नेमके काय करायचे हे स्पष्ट असेल, तर निर्णय घेताना अडचणी येत नाहीत. करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या मार्गावर जाण्यासाठी जिद्द, कष्ट व ध्येय समोर ठेवून विविध मार्गांचा अभ्यास करून स्वतः ला घडवले पाहिजे. पालकांनीही मुलांवर आपली मते न लादता आपल्या पाल्याच्या आवडी निवडीवर लक्ष देवून त्यांच्याशी संवाद साधून अभ्यास व करियरच्या दिशेने शिक्षणाकडे पाहायला हवे.
दरम्यान, डॉ. तरटे यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील विविध संधी, परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांच्या माध्यमातून परदेशात उपलब्ध असलेल्या संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी चंचल चौधरीने, तर आभार प्रा. सीमा हवालदार यांनी मानले.
