राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणी यांचा आरोप
नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर बुधवारी राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले होते. संसदेत अविश्वास प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. (Smriti Irani alleges that Rahul Gandhi gave a flying kiss in Parliament)
तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. स्मृती इराणी म्हणाल्या की, देशाच्या इतिहासात प्रथमच भारत मातेच्या हत्येची चर्चा झाली आणि काँग्रेस पक्षाने टाळ्या वाजवल्या. त्या म्हणाल्या की, मणिपूरचे विभाजन झालेले नाही. मणिपूर हा देशाचा अविभाज्य भाग आहे आणि तसाच राहील.
स्मृती इराणी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, तुम्ही ‘इंडिया’ नाही, कारण इंडिया भ्रष्ट नाही. भारत घराणेशाहीवर नव्हे गुणवत्तेवर विश्वास ठेवतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मला राहुल गांधींच्या सांधेदुखीवर काही बोलायचे नाही. पण ते ज्या यात्रेबद्दल बोलत आहेत. त्या यात्रेदरम्यान त्यांनी काश्मीरमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत आनंद घेतला, पण हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्यानंतर शक्य झाले, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, फ्लाईंग किस प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचे पत्र दिले आहे. राहुल गांधींनी संसदेत केलेल्या गैरवर्तनासंदर्भात भाजपच्या २२ खासदारांनी तक्रारीचे पत्र दिल्याची माहिती आहे.
