गुरुवर्य निवृत्ती मारणे स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न
पुणे : कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे आणि स्व. सुजय सकपाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुजय प्रतिष्ठान व सुदर्शन मित्र मंडळ, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिरोळे रस्त्यावरील सुदर्शन हॉल येथे झालेल्या शिबीरात १०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबीराचे उद््घाटन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, उद्योजक किसन भोसले, डॉ.दत्ता कोहिनकर, डॉ.शैलेश गुजर, बाळासाहेब गांजवे, अरविंद चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी शांतीदूत परिवाराच्या तृषाली जाधव, आकार संस्थेच्या स्वाती देवळे, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.
रक्तदान, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या किशोर सातपुते, अमोल रेणुसे, विक्रांत धोत्रे, आदर्श पवार, निलम पाटील, नयन पुजारी, प्रविण घरडे यांसह शिवपुत्र प्रतिष्ठान, कन्नड युवक संघ, महाराणा युवक संघ, गजराज ग्रुप ट्रस्ट आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे स्वरुप होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात रामदास मारणे, सुरेश सकपाळ, शाम मारणे, सुधीर सकपाळ, संजय सकपाळ आदींनी सहभाग घेतला. सागर भंडारी यांनी सूत्रसंचालन केले.
