कोकणातील प्रतिभावान युवा चित्रकाराचे आंतरराष्ट्रीय कला दालनात चित्र प्रदर्शन
कोकण पुत्र शैलेश मनोहर गुरव याच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन.
आर्टीव्हल फौंडेशन, मुंबई तर्फे आयोजित ‘ऱ्हाप्सोडी २०२३’ या कला प्रदर्शनात कोकणातील युवा चित्रकार शैलेश मनोहर गुरव याची चित्रे प्रदर्शित होणार आहे. हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दि ८ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनात शैलेश गुरव सोबत इतर २५ प्रथितयश चित्रकार आपल्या कलाकृती प्रदर्शित करतील.

शैलेश गुरव मुळचा कोकण रहिवासी असून कोकणच्या मातीतील अस्सलता त्याच्या चित्रांमध्ये उतरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कणकवली तालक्यातील गाव – लोरे नंबर १ हे शैलेश चे मूळ गाव आहे. कोकणातील निसर्गरम्य भागातील सृष्टी सौन्दर्य, संस्कृती, रूढी व परंपरा यांचा वैभवशाली वारसा, तेथील रहिवाशांची साधी राहणी, उत्सवप्रियता वगैरेंचे एक नितांत सुंदर दर्शन रसिकांना त्यांच्या चित्रांमधून होते. शैलेश याच्या चित्रांचं वैशिष्टय म्हणजे त्यांची चित्रे ही दृश्यातील सूक्ष्म बारकावे आपल्या चित्रांमध्ये टिपतात. आणि संपूर्ण चित्र हे नेटकेपणाने कॅनव्हासवर चित्रित केलेले असते. तेजस्वी रंगांचा वापर चित्रांच्या सात्विकतेला तेजाची झळाळी प्रदान करतात. त्याच्या चित्रांतील टाळ, लामन दिवा, मंदिरातील घंटा यांना अध्यात्मिक भारतीय जीवनात महत्वाचे स्थान आहे. यांचं कॅनव्हासवरील चित्रण सर्व रसिकांना आध्यात्मिक अनुभूती देतात. त्याच्या चित्रातील टाळ, लामण दिवा, घंटा यांचे मंदिरांच्या आणि निसर्गाच्या धूसर पार्श्वभूमीवरील ठसठशीत चित्रण आपल्याला मनातील आध्यात्मिक तरंगांना जागरूक करते. आध्यात्मिक अनुभूतीची वातावरणही तसेच असणे गरजेचे असते. शैलेश यांची चित्रे त्या वातावरणाची निर्मिती करण्याचं काम करतात. यापूर्वी सुद्धा शैलेश याने आपल्या कलाकृतींतून कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेतकरी, गाय, बैल, गॅस बत्ती, कंदील तसेच बऱ्याच लोप पावत असलेल्या वस्तू चित्र माध्यमातुन जतन करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. त्याच्या चित्रांतून महाराष्ट्राच्या रुढी परंपरा, काळानुरूप लोप पावत जाणाऱ्या ऐतिहासिक गोष्टी आपल्या चित्र माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करत आहे.
आतापर्यंत त्याने मुंबईतील अनेक कला दालनांत प्रदर्शनांतून आपल्या कालाकृती सादर केल्या आहेत. जे.एम. डी आर्ट गॅलरी, अंधेरी येथे एकल प्रदर्शन तसेच, आर्ट प्लाझा गॅलरी, आर्टीव्हल कला महोत्सव, वल्ड ट्रेड सेंटर मुंबई, ग्लोबल कोकण महोत्सव गोरेगाव मुंबई, संस्कृती कला महोत्सव ठाणे अशा अनेक प्रदर्शनातून त्याने आपला सहभाग नोंदवला आहे.
शैलेश याच्या कलाकृतीबरोबरच रसिकांना विविध भावदर्शन करणाऱ्या कलाकृती ‘Rhapsody 2023’ या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. त्यामुळे चुकवू नये असे हे प्रदर्शन हे. शिवाय कोकणच्या मातीतला साधेपणा आणि सौन्दर्य चित्रित करणाऱ्या शैलेश गुरव यांची चित्रेही रसिकांना आनंद देतील याची खात्री आहे. त्यामुळे चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.
