कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल
नवी दिल्ली : कॉँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आज त्यांना पुन्हा त्यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयांकडून याबाबत आज अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यामुळे खासदार राहूल गांधी यांच्यासह कॉँग्रेसला देखील मोठा दिलासा मिळाला असून संसदेत आता पुन्हा एकदा राहूल गांधी यांचा आवाज जनतेला ऐकायला मिळणार आहे.
दरम्यान, राहूल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आल्याने कॉँग्रेस पक्षा कडून दिल्लीसह देशभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मागील वर्षी कर्नाटकातील एका सभे दरम्यान राहूल गांधी यांनी मोदी आडनावा वरून टिपणी केली होती. या प्रकरणी गुजरात स्थानिक न्यायालयाने राहूल गांधी यांना मोदी आडनावाचा अपमान केल्या बद्दल दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर केवळ 24 तासांच्या आता राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी गुजरात स्थानिक न्यायालयाच्या निर्णया विरोधात गुजरात हायकोर्टात गेले होते. मात्र गुजरात हायकोर्टाने देखील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. यावर शेवटचा पर्याय म्हणून राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी (दि. 4) सर्वोच्च न्यायालयाने गुजरात स्थानिक न्यायालयाच्या निर्णयावर टिपणी करत दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहूल गांधी यांचा खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आज (दी. 8) कॉँग्रेस कडून राहूल गांधी यांना खासदारकी परत देण्यात यावी या संदर्भात अर्ज केला. त्यानंतर लगेचच लोकसभा सचिवालयांकडून अधिसूचना जाहीर करत राहूल यांना खासदारकी पुन्हा बहाल केली आहे.

