‘दगडूशेठ’ च्या अयोध्या श्रीराम मंदिराच्या सजावटीचे वासापूजन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगणात संपन्न झाले. गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या हस्ते वासापूजन झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, राजेंद्र सूर्यवंशी, इंद्रजित रायकर, अंकुश रासने, सचिन आखाडे, तुषार रायकर, कला दिग्दर्शक अमन विधाते, विकास काळे मांडववाले यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. संपूर्ण सजावट ही फायबर मटेरीयलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत.
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.
