कै विनायक निम्हण मेमोरियल 57व्या वरिष्ठ राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात पुणे संघाला, तर पुरुषांमध्ये मुंबई संघाला विजेतेपद
पुणे : सनी स्पोर्टस वर्ल्ड, सोमेश्वर फाऊंडेशन व क्रिडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण मेमोरियल 57व्या वरिष्ठ राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात पुणे संघाला, तर पुरुषांमध्ये मुंबई संघाला विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत कॅरमच्या इतिहासात प्रथमच पुण्यात या स्पर्धेचे आयोजन होत असून महिलांच्या या विजयाने पुणेकरांना आगळी वेगळी भेट मिळाली आहे. सांघिक गटात साखळी सामन्यात मुंबई आणि पुण्याचे प्रत्येकी ८ असे सम सामान गुण झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अंतिम सामन्यात पुण्याने बाजी मारली. पुण्याच्या संघाने मुंबईला २-१ असे नमवून पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविले. मुंबईच्या काजल कुमारीने पहिल्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या तुलिका चौरसियाला २५-०, १९-१६ असे हरवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. परंतु दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात पुण्याच्या मेधा मठकरीने मुंबईच्या अंबिका हरिथवर १८-१३, २५-१३ असे अनपेक्षित सरळ दोन सेटमध्ये मात करून सामना बरोबरीत आणून रंगत वाढवली. दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात पुण्याच्या पुष्कर्णी भट्टड व श्रुती वेळेकर जोडीने मुंबईच्या संगीता चांदोरकर व मिताली पाठक जोडीवर १९-११, १४-७ असा सहज विजय नोंदवून पुण्याच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पुरुषांच्या सांघिक गटात मुंबई संघाने बाजी मारली. मुंबईने पुण्याच्या संघाला ३-० असे सहज हरवून आपले वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या एकेरीच्या सामन्यात मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने पुण्याच्या सागर वाघमारेला २०-१४, २४-१० असे हरवून संघाचे खाते उघडले. तर दुसऱ्या एकेरीत मुंबईच्या महंमद घुफ्रानने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर १९-२१, २५-२३, २५-१ असा तीन सेटमध्ये विजय मिळविला. दुहेरीच्या तिसऱ्या लढतीत मुंबईच्या संदीप देवरुखकर व योगेश धोंगडे जोडीने पुण्याच्या प्रकाश गायकवाड व रहीम खान जोडीला २५-०, २५-० असे एकतर्फी हरवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगर संघाने ठाण्याच्या संघाला २-१ असे हरवून कांस्य पदकाची कमाई केली. या लढतीचे निकाल पुढीलप्रमाणे.
संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि झैद अहमद ( ठाणे ) २३-२२, १७-१३
शरद मोरे ( मुंबई उपनगर ) वि वि दीपक गणिका ( ठाणे ) १४-१८, २५-१५, २५-१६
समीर अन्सारी / शोएब अन्सारी ( ठाणे ) वि वि जावेद शेख ( मुंबई उपनगर ) २३-१९, २५-१३
