डॉ. कलाम प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त ड्रीम फउंडेशन व डॉ. अब्दुल कलाम कौशल्य विकास केंद्र द्वारा आयोजित डॉ. कलाम प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले होते. महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महा एनजीओ फेडरेशनचे मुकुंद शिंदे राहुल जगताप आदी उपस्थित होते.
शेखर मुंदडा म्हणाले, आयुष्यात कधीही तुम्ही अपयशी झालात तर हार मानू नका, कारण अपयशाचा अर्थ तुम्ही यश मिळविण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न असतो. दुसऱ्याला पराभूत करणे तर फार सोपे आहे. कठीण तर दुसऱ्याचे मन जिंकणे आहे.
ते पुढे म्हणाले, कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते, सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात. ही शिकवण भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी दिली आहे ती आपण अंगिकारली पाहिजे. येत्या काळात आपल्याला ५ जी वर काम करावे लागणार आहे ते म्हणजे गीता, गंगा, गोमाता , गुरु व गोविंद, असेही त्यांनी सांगितले. काशिनाथ भातगुणकी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
