एसएसपीयुतर्फे दीक्षारंभ सोहळा २०२३चे यशस्वीरीत्या आयोजन
पुणे २ ऑगस्ट २०२३: सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) किवळे तर्फे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ सोहळा २०२३चे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी भारत फोर्ज लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अमित बी. कल्याणी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून होते. याप्रसंगी कोटक महिंद्रा बँकेचे चेअरमन प्रकाश आपटे आणि प्रॉस्पिरा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजय सेवेकरी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे उदघाटन सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, एसएसपीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि मुख्य पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.
विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला १५०० हून अधिक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात उच्च शिक्षणात कौशल्य शिक्षण देण्याची विद्यापीठाची बांधिलकी दिसून आली.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी एसएसपीयुच्या अनोख्या व अनुभवात्मक शिक्षण पद्धतीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणातून त्यांची आवड ही व्यवसायात आणि उद्योगांमध्ये रूपांतर करण्यास मदत करत असल्याचे सांगितले. तसेच डॉ. मुजुमदार यांनी कौशल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
भारत फोर्ज लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक अमित बी. कल्याणी यांनी उत्पादन क्षेत्राचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारांविषयी माहिती म्हणाले की, “भारत एका मोठ्या परिवर्तनाच्या मार्गावर आहे. सरकारची धोरणे, भारताबाहेरील भू-राजकीय घटक आणि अनेक देशांतील लोकसंख्याविषयक समस्या यांसारखे अनेक घटक परिवर्तन घडवून आणत आहेत. आज आपल्या जीडीपीचा १६ ते १७ टक्के वाटा हा उत्पादन क्षेत्रातून येतो हाच उत्पादन क्षेत्राचा वाटा २५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे”. म्हणजेच उत्पादन क्षेत्र हे देशाच्या जीडीपीपेक्षा दीडपट वेगाने वाढणार आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतातातील उत्पादन क्षेत्र हे अधिकाधिक स्वावलंबी होत आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहेत. तसेच बदल भविष्यात इतरही क्षेत्रांमध्ये बदल घडून येतील,हे भारताच्या उद्योगक्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे एक द्योतक आहे.
प्रॉस्पिरा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजय सेवेकरी यांनी विद्यापीठातील कौशल्य अभ्याक्रमाचे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या प्रयोगशाळांचे कौतुक केले. सेवेकरी म्हणाले की, भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे, आणि त्याच अनुषंगाने भविष्यात विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे म्हणाले की, “कौशल्य शिक्षण हा सिंबायोसिसने घेतलेला एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमधील तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण वर्ग हा भारतासाठी फायदेशीर बाब आहे. अशा तरुण वर्गाला कौशल्य शिक्षण देऊन उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल आणि याचा फायदा भारताला विकसित देश म्हणून नावारूपास येण्यास मदत होईल.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम, विद्यापीठातील सहाय्य सेवा, अत्याधुनिक कॅम्पस आणि इतर सुविधांचा परिचय करून देण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून उद्योगातील तज्ञांकडून करिअर मार्गदर्शनाची संधी मिळाली.
