लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंवर चित्रपट करणे शिवधनुष्य पेलण्यासारखे – केदार शिंदे
पुणे:- “साहित्यरत्न अण्णा भाऊंचे धगधगते जीवन सर्व समाजाला निश्चितच प्रेरणादायी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे प्रत्येक महापुरुषाला जातीच्या चौकटीत बसवले गेले हे खूपच वेदनादायी आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे” असे उद्गार दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, ललित कला केंद्र, गुरूकुल आणि मिती फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक मा.केदार शिंदे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते *लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार* प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते .
सुप्रसिद्ध महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्यावरील महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांना रू.५,०००/-चा डिमांड ड्राफ्ट तसेच सन्मानचिन्ह, समता सप्तक, शाल इ. देवून सत्कार करण्यात आला. तसेच श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल उद्योजक अनिल सौंदडे व प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर ललित कला केंद्र गुरूकुलचे संचालक डॉ.प्रविण भोळे, अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सौंदडे व डॉ.वायदंडे यांचीही भाषणे झाली. यावेळी .केदार शिंदे यांची मुलाखत शाहीर हेमंतराजे मावळे व लेखिका अमृता खाकुर्डीकर यांनी घेतली. त्यालाही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबुरी पवार हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ.प्रविण भोळे यांनी केल.
– लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला मिळालेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा पहिलाच पुरस्कार आहे, तो बाबांच्या आठवणींना समर्पित करत कृतज्ञतेने स्वीकार करतो, असे भावपूर्ण उद्गार केदार शिंदे यांनी काढले.
– बाईपण भारी देवा’ चित्रपटाने व्यावसायिक यश नक्कीच दिले आहे. पण स्त्रीप्रधान चित्रपट करताना मी माझ्या आईची प्रतिक्रिया काय असेल? याचा नेहमी विचार करतो. त्याबाबत आईच आयकॉन आहे, असेही मुलाखतीत शिंदेंनी सांगितले.
