क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळली; 17 जण जागीच ठार
ठाणे : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही. आज मध्यरात्री समृद्धी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. पुलाचे काम सुरू असताना क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळली आहे. यामध्ये आतापर्यत 17 कामगारांचा मृत्यू झाला असून ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. क्रेन खाईल अजून सहा ते सात कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जोरात सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर जवळच्या सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला येणार आहेत. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.
