Crime News : पतीने भररस्त्यात पत्नीवर केला चाकूने हल्ला
मुंबई : शहरातील खारमध्ये पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे.
खार पश्चिमेत रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हे जोडपे धारावी पट्ट्यातील रहिवासी आहेत. दोघांचं वैवाहिक आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. त्यांच्यात वाद सुरु होते. शिवाय त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
रविवारी रात्री धारावीच्या शाहू नगर परिसरातून खार इथे फिरायला गेले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. दोघांमधील वादावादी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे 14 व्या रोडवर होते, त्यावेळी पतीने त्याच्याजवळ असलेल्या पेपर कटरने पत्नीवर हल्ला केला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर तो तिला रक्तबंबाळ सोडून पळून गेला.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांची या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच खार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बोलताना अडचणी येत असल्या तरी महिलेने पतीविषयी काही तपशील दिले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं. आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्ड तपासत असल्याचं पोलीस म्हणाले.
दरम्यान पतीकडे चाकू नेमका कुठून आला, हा गुन्हा रागाच्या भरात घडल की पत्नीची हत्या करण्याचा त्याचा कट होता का या संदर्भात आता अधिक तपास खार पोलीस करत आहेत.
