Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेने सज्ज राहावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : हवामान विभागाने पावसाच्या संदर्भात जिल्ह्यात २२ जुलै पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केले असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे. जिल्ह्यात २३ गावे दरडप्रवण आणि ८४ पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे.

ते पुढे म्हणाले, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नियत्रंण कक्ष कार्यान्वित असल्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालयस्थळ सोडू नये. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणे अद्ययावत असल्याची दक्षता घ्यावी.

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असही जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्य अभियंता  चव्हाण म्हणाले, मुसळधार पाऊसाच्या पार्श्वभूमीवर घाटप्रवण क्षेत्रात दरडी हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात करावयाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading