मराठी भाषा तत्त्वज्ञानासाठी उपयुक्त : डॉ. सदानंद मोरे
पुणे : भारतीय तत्त्वज्ञान प्राचीन आहे, त्यावर अभ्यास करून अभ्यासकांनी भाष्य केले. त्यातून दर्शने निर्माण झाली. मराठी भाषा तत्त्वज्ञानाच्या मांडणीसाठी उपयुक्त आहे याचे आदर्श उदाहरण चक्रधर, ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज यांनी घालून दिले आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतनसार’ या पुस्तकाला तसेच डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांच्या ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या ग्रंथाला डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, उद्धव कानडे, आनंदिनी क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, समर्थांच्या मठांनी ज्ञानाची परंपरा जागती ठेवली आहे. संत तुकारामांच्या अभंगांची हस्तलिखिते वारकऱ्यांच्या फडात सापडतात तेवढीच समर्थांच्या मठातही सापडतात. आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या ज्या नवीन माध्यमाचा अंगिकार करते आहे. त्याचा वापर संत साहित्य तरुण पिढीपर्यंत नेण्यासाठी केला पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “भारतीय तत्त्वज्ञान विश्व समृद्ध आहे कारण त्यात वैचारिक मोकळेपणा आहे. खंडन-मंडन या गोष्टी खूप सहजतेने केल्या जात. भारतीय संतांनी अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. संतांनी त्यांचे साहित्य तरुण वयात लिहिले. मात्र आपल्याकडे ते उतार वयात वाचले जाते. आज काळाने जे प्रश्न उभे केले आहेत त्याची उत्तरे संत साहित्यात आहेत. संत साहित्यात केवळ अध्यात्म, वैराग्य आणि निवृत्तीचा विचार नाही. त्यात प्रखर प्रवृत्तीवाद आहे. महाराष्ट्र भूमीत रामभक्तीला अधिक दृढ करण्याचे काम समर्थ रामदासांनी केले. प्रयत्न, प्रत्यय आणि प्रबोध या तीन सूत्रात समर्थांचे तत्त्वज्ञान सामावले आहे. डॉ. विजय लाड, डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
