Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठात जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

 

पुणे  : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) किवळेतर्फे १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन विविध कौशल्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यापीठाच्या परिसरात वर्ल्ड युथ स्किल्स कन्वेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन नीती आयोगाचे माजी विशेष सचिव के. राजेश्वर राव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. वर्ल्ड युथ स्किल्स कन्वेशन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कौशल्यपूरक उपक्रमांमध्ये कौशल्यपूर्ण हॅन्ड्स ऑन कार्यशाळा,कौशल्य चाचणी, कौशल्य स्पर्धा, तसेच विविध उद्योगांमधील तज्ञांकडून करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन,अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश होता. सदरील कार्यक्रमाला पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती .या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगांमधील तज्ञांकडून करिअरबाबत अमूल्य मार्गदर्शनाची संधी मिळाली. तसेच व्यावहारिक प्रशिक्षण, हँड्स-ऑन ट्रेंनिंग, विविध प्रात्यक्षिके अनुभवता आली. एसएसपीयु हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्याधारित विद्यापीठ असून नेहमीच कौशल्यपूरक उपक्रमांना प्रोत्साहित करते. कौशल्य-निर्मिती, तसेच उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की जागतिक कौशल्य दिन हा कौशल्य ओळखण्यासाठी एक पाऊल आहे. आपल्या सर्वांमध्ये जन्मजात कौशल्य असते.आजचा हा दिवस प्रत्येकाच्या अंगभूत कौशल्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. यामार्फत प्रत्येकजण आपला विकास साधू शकतो आणि प्रगतशील बनू शकतो.

नीती आयोगाचे माजी विशेष सचिव के. राजेश्वर राव एसएसपीयुच्या आधुनिक शिक्षणपद्धतीचे कौतुक करत म्हणाले की कौशल्ये ही उद्योगक्षेत्रांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण आहेत .कौशल्यपूर्ण शिक्षणपद्धतीद्वारे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल. तसेच भारताला जागतिक स्तरावर वर नेण्यासाठी कौशल्य शिक्षणाचे योगदान महत्वाचे ठरेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading