Sunday, May 24, 2026
Latest NewsPUNE

मोफत महाआरोग्य शिबीरात १८ हजार ६३१ जणांचा सहभाग

 

पुणे : मानव सेवेचे महामंदिर साकारत असताना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विविध १३७ प्रकारच्या विविध तपासण्या करीत आयोजित मोफत महाआरोग्य शिबीरात १८ हजार ६३१ जणांची तपासणी व उपचार करण्यात आले. पुणे शहरासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्या करीत साहित्य व औषधे वाटप देखील करण्यात आले. याकरिता पुणे जिल्ह्यातील ९० रुग्णालये व संस्थांच्या प्रतिनिधींनी शिबीरात अखंड ९ तास सेवा दिली.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. यावेळी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या डॉ. अंजली टिळेकर, डॉ.संजीव डोळे, डॉ. संदेश पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, यतिश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, अमोल चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टतर्फे फिरता दवाखान्याचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी व सहकाऱ्यांनी शिबीराच्या नियोजनात विशेष सहभाग घेतला.

डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, प्रत्येकाच्या आरोग्याची चाचणी होणे आवश्यक आहे. या चाचण्या योग्य वेळेत झाल्या तर नंतरचे दुष्परिणाम टाळता येतील. विकसित, संतुलित, समृद्ध, सुविद्य, सक्षम भारत व्हावा, यासाठी अशा शिबिरांच्या माध्यमातून व रुग्णसेवेच्या माध्यमातून ट्रस्टचे सुरु असलेले काम आशादायी आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, विकसित भारत घडविण्याकरिता प्रत्येक नागरिक निरोगी असणे गरजेचे आहे. नागरिकांनी निरोगी राहावे, यादृष्टीने ट्रस्टतर्फे आरोग्य सेवा दिली जाते. यंदा महा आरोग्य शिबीराचे दुसरे वर्ष आहे. यामाध्यमातून हजारो शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अनेक उपचार मोफत करण्यात आले आहेत. यापुढेही हे रुग्णसेवेचे कार्य सातत्याने सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाआरोग्य शिबीराकरिता सुमारे १५ हजार नागरिकांनी नोंदणी केली होती. शिबीरात ह्रदय आजार, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी हे उपचार विनामूल्य करून देण्यात आले.

तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती देखील देण्यात आली. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्यसेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.

* तब्बल १४ रुग्णवाहिकांसह फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून अखंडीत सेवा
ट्रस्टच्या एकूण १४ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅन रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. आता यामध्ये अंजली माशेलकर फाऊंडेशनच्या सहकार्याने फिरत्या दवाखान्याचा देखील समावेश झाला आहे. याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading