Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

शब्दप्रेमामुळे मराठी रंगभूमीचे शरीर व रंगभाषेकडे दुर्लक्ष: ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे यांचे मत

 

पुणे :  मराठी रंगभूमीने शब्दविरहित रंगभाषेकडे पुरेसे लक्ष दिले नाही. नट – नाटककारही शरीरभाषेपेक्षा शब्दांमध्ये रमले. त्यामुळे अपवाद वगळता, मराठी रंगभूमीवर शब्दविरहित रंगभाषेने मांडलेला समृद्ध आशय मर्यादित राहिला, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी शनिवारी येथे मांडले. पारंपरिक शहाणपण सामावणार्या म्हणी, वाक्प्रचारांच्या माध्यमातून, समकालीन वास्तवाला भिडणारा सर्जनशील नृत्याविष्कार मांडण्याची संधी देणाऱ्या ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट’, या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रंगभाषा आणि शारीर भाषेतूनही रसिकांना गुंतवून ठेवणारा संपन्न नाट्यानुभव शक्य आहे, हे पारंपरिक कलाप्रकारांनी सिद्ध केले आहे. त्या परंपरांचे पुनर्जागरण महत्त्वाचे आहे, असेही केंद्रे म्हणाले.

ज्येष्ठ कथक नृत्यांगना, नृत्यगुरू विदुषी शमा भाटे, नादरूप संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रस्ता येथे या उपक्रमाची सुरुवात केंद्रे यांच्या विशेष सादरीकरणातून झाली. या उपक्रमासाठी रमा व माधव मांजरेकर या कलाप्रेमींनी विशेष सहकार्य केले आहे.

वामन केंद्रे यांनी ‘व्हिज्युअल थिएटर’ (दृष्य नाटक) या विषयावर सादरीकरण केले. केरळमधील पारंपरिक प्रहसनात्मक प्रस्तुती, झुलवा, मध्यमव्यायोग, अशोकवाटिका आणि रणांगण आदी नाटकांची उदाहरणे देत केंद्रे यांनी दृष्य नाटकाची संकल्पना स्पष्ट केली. नाट्यशास्त्रकार भरत मुनींनी दृष्यश्राव्यकाव्येषु नाटकं, अशी व्याख्या केली आहे. नजरेला दिसणारे, ऐकता येणारे आणि भावाभिव्यक्तीला आवाहन करणारे सादरीकरण, म्हणजे नाटक, असा अर्थ अभिप्रेत आहे. पण आपले रंगकर्मी अद्याप नाट्यशास्त्राला भिडलेच नाहीत. शब्दप्रधान रंगभूमी, असाच अर्थ गृहित धरून नाटके होत राहिली आहेत, याकडे केंद्रे यांनी लक्ष वेधले.

दृष्य नाटक हे शब्दांशिवाय किंवा अगदी मोजक्या शब्दांनिशी अस्वस्थ करणारा आशय पोहोचवते. शरीरभाषेचा आणि रंगभाषेचा (नेपथ्य, रंगभूषा, वेषभूषा, संगीत, प्रकाशयोजना आदी) कल्पक वापर उत्तम आशयनिर्मिती करू शकतो, मात्र या शक्यता पुरेशा आजमावल्या गेल्या नाहीत, हे वास्तव आहे. मौनही बोलके ठरू शकते, शरीरभाषा संवाद साधू शकते, अनेकदा शरीरभाषा नेपथ्यविशेष निर्माण करू शकते. घाशीराम कोतवाल हे याचे उत्तम उदाहरण आहे. रतन थिय्याम, हबीब तन्वीर, के. पण्णिकर अशा प्रतिभावंत रंगकर्मींनी रंगभाषा आणि शरीरभाषेचा अधिकाधिक वापर करून अत्युच्च दर्जाचा नाट्यानुभव निर्माण केला आहे. दृष्य नाटकात साहित्यप्रतिमा, भावना, विचार, आध्यात्मिकता, उर्जा..व्यक्त करणार्या अनेक प्रतिमांचा वापर केला जातो. आधुनिक काळात कोलाज, मोंटाज यांचाही वापर होतो, असेही केंद्रे म्हणाले.

अमीरा पाटणकर यांनी स्वागत केले. विदुषी शमा भाटे यांनी वामन केंद्रे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading