साहित्यच माणसाला प्रगल्भ करते : न्या. चपळगावकर
पुणे : सत्वशील माणसांप्रमाणेच कसदार साहित्याने मला घडविले. त्या काळी वाचलेल्या साहित्याने सर्व प्रकारची जाणीव दिली. साहित्य माणसाला प्रगल्भ करते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने न्यायमूर्ती चपळगावकर यांचा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. योगायोग म्हणजे चपळगावकर यांचा आज वाढदिवस असल्याने या सोहळ्यात दुग्धशर्करा योग जुळून आला.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे, नंदिनी चपळगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, उपाध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित होते.
न्या. चपळगावकर म्हणाले, “समाज अनेकदा आपल्याला आधार देतो, उभे करतो. त्याचप्रमाणे साहित्य प्रगल्भ जाणीवा देते. समाजात काय टिपायचे हे समजण्यासाठी लेखकाची नजर लागते. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर यांनी एक वेगळेच जग उलगडले, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर यांचे बोट धरून आम्ही प्रेम करायला शिकलो. त्यातून मन समृद्ध होत गेले. साहित्य माणसाला मोठं करते आणि बोटाला धरून पुढे नेते ही जाणीव मनात आहे. आज कथा लुप्त का होते आहे. कथेइतके सामर्थ्य कशातही नाही त्यामुळे कथा लेखनाला प्रोत्साहन मिळायला हवे.
प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. ते म्हणाले, ग्रंथकार संमेलनाची सुरुवात करणाऱ्या आणि पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या न्या महादेव गोविंद रानडे यांच्या नंतर न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे न्यायमूर्ती असणारे दुसरे संमेलनाध्यक्ष आहेत. ते व्रतस्थ ज्ञानोपासक आहेत. तर्कशुद्ध मांडणी, वैचारिक स्पष्टता, निर्भयता,तटस्थता, अव्यभिचारी जीवननिष्ठा आणि वाडमयनिष्ठा यामुळे त्यांच्या वैचारिक लेखनाला वेगळे परिमाण लाभले. लालित्य आणि शैलीदार लेखन यामुळे त्यांच्या लेखनाला जाणते वाचक मिळाले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
