Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘या’ मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत!

निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. याआधी विविध व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दीप्ती केतकरदेखील या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’  कशी लपूनछापून फुलतेय, हे पाहायला मिळेल.

दीप्ती कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. विविध मालिका आणि चित्रपट यांतून ती नेहमीच आपल्या  प्रेक्षकांसमोर येते. आता ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या नव्या मालिकेतून ती एका विशिष्ट  व्यक्तिरेखेद्वारे आपल्या भेटीस येते आहे. यामिनी सराफ असे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून राजवीरच्या आईच्या भूमिकेत ती असणार आहे. यामिनी या मालिकेतून नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता ही व्यक्तिरेखा ती कशी फुलवते आणि राजवीर आणि मयूरी यांच्या आयुष्यात ती किती ढवळाढवळ करते, हे आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे हे कलाकार या मालिकेतून प्रमुख भूमिकांत पाहायला मिळतील. या मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर करताहेत आणि त्यांच्याच अजय मयेकर फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती करण्यात येते आहे.

आता सोनी मराठीवर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका १७ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading