कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘रावण’च्या रूपातील चित्र केले ट्विट
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. त्यानंतर कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर ट्वीटच्या माध्यमातून टीका करण्यास सुरुवात केली. आता कंगनाने अजून एक ट्वीट केले आहे. मुख्य म्हणजे हे ट्वीट मराठीत असून यामध्ये तिने उद्धव ठाकरे यांचे रावणाच्या रूपातील चित्र पोस्ट केले आहे. हे चित्र कंगनाला तिचे मित्र विवेक अग्निहोत्री यांनी पाठवले असल्याचे तिने सांगितले आहे.
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ‘मला बरेच मीम्स मिळाले आहेत, हे मीम माझ्या मित्राने, विवेक अग्निहोत्री याने पाठवली आहे. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन, जय हिंद, जय महाराष्ट्र’
Received many memes, this one sent by my friend @vivekagnihotri ji made me emotional.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 12, 2020
लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन.
जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन
जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏 pic.twitter.com/c4KvpVcqX1
महत्वाचे म्हणजे या ट्वीट सोबत जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. चित्रामध्ये समोर शिवाजी महाराज कंगनाच्या रूपातील झाशीच्या राणीला तलवार प्रदान करताना दिसत आहेत व मागे उद्धव ठाकरे व त्यांचे दहा तोंडे रेखाटण्यात आली आहेत. अशाप्रकारे कंगनाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. याआधी तिने एक व्हिडि पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता.
शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी, कंगना मागे हटायला तयार नाही.
