कोरोना विषाणू मानवनिर्मित? – चीनमधून पळून गेलेले शास्त्रज्ञ लवकरच सादर करणार पुरावे
बीजिंग – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना संसर्ग संपूर्ण जगभर थैमान घालतो आहे. हा विषाणू कृत्रिम की नैसर्गिक यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे याविषयी चीनकडे अख्ख्या जगाचं लक्ष आहे. त्यातच, चीनचे प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यांनी हा विषाणू मानवनिर्मितच असून आपण लवकरच याबद्दल पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असल्याचा संशय पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात येत होता. तसेच, चीनमधील अनेक शास्त्रज्ञांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. डॉ.ली-मेंग हे सुद्धा चीनमधील प्रसिद्ध विषाणूशास्त्रत्र असून त्यांनी चीनमधून पळ काढला आहे. सध्या ते अमेरिकेत वास्तव्यास असून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा केलया. तसेच, याबाबतचे लवकरच पुरावे सादर केले जातील असंही ते म्हणाले आहेत. शिवाय, वुहानच्या मासळी बाजारातून हा विषाणू फैलावला असल्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
‘चीनचा मांस बाजार हा एखाद्या पडद्यासारखा वापरण्यात आला आहे. या पडद्यामागे बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. हा विषाणू नैसर्गिक नाही. वुहानच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर आला असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, जीनोमचा सिक्वेन्स हा माणसाच्या बोटांच्या ठश्यासारखा आहे. याआधारावर त्याची ओळख पटवता येऊ शकते. भक्कम पुराव्याच्या आधारे हा विषाणूच्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे सांगणार असल्याचे डॉ.मेंग त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, त्यांची माहिती चीनच्या सरकारी डेटाबेसमधून हटवण्यात आली आहे. सहकाऱ्यांना माझ्याविरोधात अफवा पसरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या मोजक्या काही शास्त्रज्ञांपैकी आपण एक असल्याचे त्यांनी म्हटले. चीन सरकार आपल्या जीवावर उठले असून हाँगकाँगमधून अमेरिकेत स्थलांतरीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चीनने कोरोनाचा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत बनवला असल्याचा आरोप याआधीदेखील अनेकदा फेटाळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावासमोर झुकत चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकाला करण्यासाठी चीनमध्ये प्रवेश दिला. वुहान प्रयोगशाळेच्या संचालकांनीही करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्मित झाला नसल्याचे म्हटले आहे.
