काँग्रेस हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम
बैठकीत 23 नेत्यांच्या ‘त्या’ पत्रावरून खडाजंगी
नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीच्या आगामी बैठकीपर्यंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. सुमारे सात तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिलेले पत्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पक्षातील तरुण नेत्यांनी दाखवलेला विश्वास आणि राहुल गांधी आणि पक्षातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद यांच्यात झालेली खडाजंगी यामुळे सोमवारची काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली.
आगामी सहा महिन्यांसाठी अर्थात पुढील कार्यकारी समितीची बैठक होईपर्यंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी कायम राहण्यास सोनिया गांधी यांनी होकार दिल्याचे सुत्रांकडून समजते. काँग्रेसचे नेतृत्व आणि पक्षातील रचनात्मक बदलाची पत्र लिहून मागणी करणार्या २३ ज्येष्ठ नेत्यांवर सोनिया गांधी नाराज झाला होत्या.
नवीन अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यास सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्याचे समजते. काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात रचनात्मक आणि नेतृत्व बदल करण्याची मागणी केली होती. कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिणार्या नेत्यांना फटकारत ते भाजपला मिळाले असल्याचा आरोप केल्याचे समजते. मात्र काँग्रेसने त्याचा इन्कार केला असून पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या २३ ज्येष्ठ नेत्यांबद्दल चक्कार शब्दही काढला नसल्याचे सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर जोरदार आक्षेप घेतला. सिब्बल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही भाजपशी हातमिळवणी केली. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसचा आम्ही यशस्वी बचाव केला. मणीपूरमध्ये भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही काँग्रेसला मदत केली. गेल्या ३० वर्षांत आम्ही कोणत्याही मुद्यावर भाजपच्या बाजूने एकही वक्तव्य केले नाही. तरीही आम्ही भाजपशी हातमिळवणी केली!.
मात्र राहुल गांधी यांनी व्यक्तिश: आपण तसे वक्तव्य केले नसल्याचे कपिल सिब्बल यांना सांगितल्यावर सिब्बल यांनी आपले हे ट्विट काढून टाकले. तर आझाद यांनी, आम्ही भाजपशी हातमिळवणी केली असेल तर आमच्यावर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला. पण त्याचवेळी राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्व बदलाची मागणी करणार्या नेत्यांवर टीका केली नसल्याचे सांगितले. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत नसलेल्या नेत्यांना मी आव्हान दिले की आम्ही भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी सिद्ध करावा, असे आझाद यांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते ए. के. अॅन्थोनी आणि अंबिका सोनी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत पत्र लिहिणार्या त्या २३ जणांवर जोरदार टीका केली.
