Sunday, October 4, 2026
Latest NewsSports

ग्रेट ब्रिटनच्या गॅरेथ पॉट्स, केली फिशर यांना सलग दुसऱ्यांदा विजेतेपद !!

पुणे :  बिलीयर्डस्‌ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडिया (बीएसएफआय) आणि अपेक्स्‌ स्पोर्ट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या ‘डब्ल्युपीए हे-बॉल जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेत गतविजेता तसेच चार वेळा ‘वर्ल्ड पूल चॅम्पियन‌’ गॅरेथ पॉट्स आणि गतविजेती ग्रेट ब्रिटनच्या केली फिशर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले.

कोंढवा येथील ‘जयराज स्पोर्ट्‌स अँड कन्व्हेन्शन सेंटर‌’मधील ‘राजन खिंवसरा बिलीयर्डस अँड स्नुकर अकादमी‌’ येथे स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिलांच्या गटातील रोमांचक अंतिम सामन्यामध्ये फिशर हिने स्वतःलाच वाढदिवसाची आधीच सुंदर भेट दिली. दहा दिवसांनी ४८ वर्षांच्या होणाऱ्या ब्रिटीश खेळाडूने सुरूवातीपासूनच उत्कृष्ट फॉर्म दर्शवला होता. उपविजेत्या ठरलेल्या थायलंडच्या वारत्थानुन सुक्रितथानेसच्या चुकांचा फायदा घेत तिने ३-० अशी जलद आघाडी घेतली होती आणि ती सहज विजेतेपद मिळवेल, असे वाटत होते. परंतु सुकित्रथानेस हिने उत्तम प्रतिकार करून ५-५ अशी बरोबरी निर्माण केली. यानंतर ‘शूटआऊट‌’मध्ये फिशरने वारत्थानुनचा ५-३ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

पुरूषांच्या गटात गॅरेथ पॉट्सने आत्तापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ग्रेट ब्रिटनच्याच जॉर्डन शेफर्डचा ७-४ असा पराभव केला. टोबियास बोंगर्सकडून पराभव स्विकारल्यानंतर ‘लुझर्स ब्रॅकेट‌’ म्हणजेच पराभूत खेळाडूंच्या गटातून आगेकूच करणाऱ्या पॉट्सने अंतिम सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याच्यासाठी सुदैवाची गोष्ट म्हणजे, उपांत्य फेरीत तगड्या आणि पुरूषांच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जॅक व्हेलनला पराभूत करणाऱ्या जॉर्डनला अंतिम सामन्यात आपली लय सापडली नाही. पॉटसने सुरूवातीपासूनच सामन्यावर निर्यत्रण ठेवले. ३-३ अशा बरोबरीनंतर त्याने आपला खेळ अधिक आक्रमक केला आणि याच महिन्याच्या सुरूवातीला ‘इंटरनॅशनल हे-बॉल ओपन‌’ स्पर्धा जिंकून आलेल्या जॉर्डनला मागे टाकले.

शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात लक्ष्मण रावत आणि वर्षा संजीव यांच्या पराभवासह भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. लक्ष्मण याला जॅक व्हेलन कडून २-७ असा तर, वर्षाला दुसऱ्या मानांकित वेंडी जॅन्स हिच्याकडून ३-६ असा पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण वर्ल्ड पुल असोसिएशनचे (डब्ल्युपीए) अध्यक्ष ईशॉन सिंग, बिलीयर्डस अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएसएफआय) अध्यक्ष एस. बालसुब्रमण्यम, बीएसएफआयचे माजी अध्यक्ष राजन खिंवसरा, जयराज स्पोर्ट्‌स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. राजेश शहा, अपेक्स स्पोर्ट्‌सचे संस्थापक आणि सीईओ शिवम अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डब्ल्युपीएचे क्रीडा संचालक यॉगर्न सँडमॅन, महाराष्ट्र बिलीयर्डस्‌ आणि स्नुकर संघटनेचे उपाध्यक्ष देवेंद्र जोशी, आंतरराष्ट्रीय स्नुकरपटू यासिन मर्चंट आदि उपस्थित होते. विजेत्या गॅरेथ आणि केली यांना ३० हजार डॉलर्सचे पारितोषिक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

स्पर्धेचा निकालः पुरूष गटः
अंतिम फेरीः गॅरेथ पॉट्स (ग्रेटब्रिटन) वि.वि. जॉर्डन शेफर्ड (ग्रेटब्रिटन) ७-४;
उपांत्य फेरीः गॅरेथ वि.वि. अँडरसन डेव्हिड (दक्षिण आफ्रिका) ७-५; जॉर्डन वि.वि. जॅक व्हेलन (ग्रेटब्रिटन) ७-२;

महिला गटः
अंतिम फेरीः केली फिशर (ग्रेटब्रिटन) वि.वि. वारत्थानुन सुक्रितथानेस (थायलंड) ५-५ (५-३);
उपांत्य फेरीः फिशर वि.वि. यू-ह्‌सुआन फॅन (ताईपाई) ६-२; सुक्रितथानेस वि.वि. डायना खोद्जाएवा  (बेल्जियम) ६-३;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading