Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आंदोलकांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दगा फटका करण्याचा डाव सरकार आखात असेल, तर ती मोठी चूक

मुंबई: प्रतिनिधी

आंदोलकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तेच खरे लोकशाहीचे द्योतक आहे. मात्र, आंदोलकांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दगा फटका करण्याचा डाव सरकार आखात असेल, तर ती मोठी चूक आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकूमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय, असा सवाल करतानाच, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला.

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading