झारखंडमधील एसीबी प्रकरणात महाराष्ट्रातील उद्योजक अमित साळुंके यांना जामीन
पुणे, : कायदेशीर गुंतागुंत आणि राजकीय रंग लागलेल्या एका प्रकरणात, सुमीत फॅसिलिटीज लिमिटेडचे संचालक अमित प्रभाकर साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) न्यायालयाचे माननीय विशेष न्यायाधीश न्या. योगेश कुमार सिंग यांनी जामीन मंजूर केला. ज्यामुळे या प्रकरणी सध्या सुरू असलेल्या कार्यवाहीला एक वेगळेच आणि महत्त्वपूर्ण वळण लागले आहे. दरम्यान, यामुळे महिन्याहून अधिक काळाच्या न्यायालयीन कोठडीतून त्यांना दिलासा मिळाला आहे.
झारखंड उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित कथित अनियमिततेप्रकरणी साळुंके यांना 24 जुलै 2025 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर लगेचच महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी याचा फायदा घेत राज्याच्या 108 रुग्णवाहिका प्रकल्पात साळुंके यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही शहानिशा न करता तसेच कोणतीही तथ्ये नसताना राज्यातील या महत्त्वाच्या आरोग्य प्रकल्पावरून देखील वाद निर्माण केला.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान, साळुंके यांच्या वकिलांनी एफआयआऱमध्ये साळुंके यांचे नाव नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांची कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून त्यांनी तपासादरम्यान पूर्णपणे सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
साळुंके यांच्याविरुद्ध कोणताही थेट किंवा पुरेसा पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने मान्य केले. तपास अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन करून अटक करण्यात आली असली तरी साळुंके यांच्या अटकेबद्दल, त्याच्या गरजेबद्दल आणि कायदेशीरतेबद्दल गंभीर चिंता निर्माण करत असल्याची टिप्पणी न्यायालयाने नोंदवली.
साळुंके यांचे वरिष्ठ वकील इंद्रजित सिन्हा म्हणाले, “माननीय सत्र न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. माझ्या अशिलाचा गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही पुरावा नसल्याचा आमचा दावा यामुळे सिद्ध होतो. न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. श्री. साळुंके तपासात पूर्णपणे सहकार्य करत राहतील.”
अटकेनंतर, अनेक राजकीय नेत्यांनी साळुंके यांचा कुप्रसिद्ध रुग्णवाहिका घोटाळ्याशी संबंध असल्याचे दावे केले होते. मात्र, ते निराधार असल्याचे सिद्ध झाले. कारण ते आरोप आजपर्यंत सिद्ध झालेले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील त्यांची प्रतिष्ठा मात्र, खराब करण्याचे काम या आरोपांनी केले आहे.
चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे आणि प्रवासावरील निर्बंध यासारख्या अटींवर साळुंके यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
