Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

शारदा, रत्नमाला व अक्षरलक्ष्मी पुरस्कारांचे थाटात वितरण

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, शास्त्राधिष्ठित शिक्षणाचा प्रसार आणि समाजाभिमुख कार्याचा संदेश देत वेदद्रीष्टी फाऊंडेशन व ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावा पदवीप्रदान व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पद्मावती येथील विणकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध वयोगटांतील, संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे १५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी, स्वागताध्यक्ष मनोज राठी, संस्थेच्या संपर्कप्रमुख अ‍ॅड. श्रुती पिसे, पुरस्कारप्राप्त मान्यवर, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

रत्नमाला कुलकर्णी यांच्या हस्ते वेदमूर्ती पं. मंदार जोशी यांना ‘रत्नमाला पुरस्कार’, ९० वर्षाच्या प्रतिभाभालेराव यांना ‘शारदा पुरस्कार’, तर वंदना धर्माधिकारी यांना ‘अक्षरलक्ष्मी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. याशिवाय वेदमूर्ती सुदर्शन कुलकर्णी व वेदमूर्ती अक्षय जोशी यांना ‘वेदविद्या भूषण पुरस्कार’, प्रा. श्रुती देवळे यांना ‘संस्कृत भारती पुरस्कार’, तर मालती मसलेकर, रविंद्र कुलकर्णी आणि रोहित तुळसे यांना ‘सहृदय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पारंपरिक पगडी, श्रीफळ, सन्मानमाला व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. वैदिक वाङ्मयाचा अभ्यास, संशोधन, अध्यापन, साहित्यनिर्मिती आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना वेदमूर्ती मंदार जोशी म्हणाले, भारतीय विज्ञान आणि ज्ञानपरंपरा अत्यंत समृद्ध आहे. या ज्ञानपरंपरेचे जतन करणे आणि त्यामध्ये अभ्यास व संशोधनातून अधिकाधिक भर घालणे ही आपली जबाबदारी आहे. वेद, पंचांग आणि प्राचीन ग्रंथांच्या सखोल अध्ययनातून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.

वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी, परोपकार, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “गुरू, ऋषी आणि परमेश्वर यांचे आपल्यावर ऋण असते. समाजाकडून आपल्याला जे काही मिळते, त्याची परतफेड समाजसेवेच्या माध्यमातून झाली पाहिजे. परोपकार हेच श्रेष्ठ पुण्य असून, प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा संकल्प करावा,” असे त्यांनी सांगितले.

पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘पाणी जपा, पाणी वाढवा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत त्यांनी उपस्थितांना जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

केवळ वृक्षारोपण करून थांबू नये, तर लावलेल्या झाडांचे संगोपन करून ती जगविण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून भावी पिढ्यांसाठी जलसंपत्ती व निसर्गसंपदा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ व्यावसायिक यश मिळविण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू व्यक्तींना मार्गदर्शन करावे, आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यातही सहभाग घ्यावा, असा संदेश गुरुजींनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.

विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात वास्तुविशारद, अंकविशारद, वास्तुभूषण, भवनशास्त्र प्रवीण, स्वप्नशास्त्र प्रवीण, पंचांग प्राज्ञ आणि लोलक विशारद आदी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे प्रयागराज येथून सचिन पांडे हे भागवत कथाकार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी वास्तुभेट आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply