इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ३,५०० कोटींची गुंतवणूक; सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन
पुणे : भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी एका मोबिलिटी आणि पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेडसह समूहातील कंपन्यांनी ३,५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून उभारलेल्या सहा उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले. पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट येथे आयोजित ‘एका आविर्भाव’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील या सहा प्रकल्पांमुळे इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांची वार्षिक उत्पादन क्षमता ४० हजारांहून अधिक वाहनांची आहे. पुण्यातील एससीव्ही, बस अँड ट्रक्स, व्हीडीएल पिनाकल इंजिनिअरिंग, इन्स्टोर इंडिया, पिनाकल सीटिंग अँड इंटेरियर्स आणि मध्य प्रदेशातील पीथमपूर येथील पिनाकल इंटेरियर्स या प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे.
या प्रसंगी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “भारतात जागतिक दर्जाची उत्पादन परिसंस्था उभारण्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वदेशी अभियांत्रिकी, संशोधन, शाश्वत मोबिलिटी आणि रोजगारनिर्मितीला या प्रकल्पांमुळे बळ मिळेल.”
समूहाने संशोधन आणि विकासासाठी ६०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असून, एक हजारांहून अधिक अभियंते व डिझायनर्स कार्यरत आहेत. समूहात सहा हजारांहून अधिक कर्मचारी असून, आगामी पाच वर्षांत अडीच लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे.
कंपनीकडे ११ हजारांहून अधिक बसच्या ऑर्डर्स असून, भारतातील विविध राज्यांबरोबरच झांझिबार आणि नेपाळमध्येही कंपनीची वाहने कार्यरत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातही विस्ताराचे नियोजन आहे. देशभरातील ७५ हून अधिक विक्री, सेवा आणि सुटे भाग केंद्रांच्या माध्यमातून ग्राहकांना सुविधा दिल्या जात आहेत.
