Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

वृद्धत्वाकडे नव्हे, आनंदी ज्येष्ठत्वाकडे जाऊ या – ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ. नंदू मुलमुले यांचे आवाहन

पुणे  – घेऊन मिळते ते सुख असते आणि देऊन मिळते तो आनंद असतो. शरीराचे वय आपण काहीही न करता वाढत असतेच, ज्यामुळे आपण वृद्ध होतो. पण आपण वृद्धत्वाकडून आनंदी ज्येष्ठत्वाकडे जाऊ या, असे आवाहन ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ. नंदू मुलमुले यांनी शनिवारी श्रोत्यांना केले. सुख घेता येते आणि आनंद देता येतो, हा मंत्र लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

अमेरिकास्थित मनोविकारतज्ज्ञ डाॅ. धनंजय चव्हाण लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाच्या ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शिका या भाषांतरित पुस्तकाच्या लोकार्पण समारंभाच्या निमित्ताने त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. यावेळी भाषांतरकार वैशाली व्यास, वृद्धकल्याणशास्त्रतज्ज्ञ ॲड. गौरी नातू, संपादक गौरी साळवेकर, तसेच ज्युबिली लक्झरी सिनियर लिव्हिंग च्या डॉ. राजसी धारिया आदी मान्यवर उपस्थित होते. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात हा कार्यक्रम झाला. राजेश व्यास ग्रुप आणि ज्युबिली लक्झरी सिनिअर लिव्हिंग यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डाॅ. मुलमुले यांनी वाढत्या मानवी आयुर्मानासंदर्भात माहिती देताना, आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध आनंदसंध्येत कसा बदलता येईल, याचे विवेचन केले. सुख आणि आनंद या समानार्थी संज्ञा नाहीत. सुख शारीरिक, भौतिक पातळीवरचे, वस्तू अथवा इंद्रियांशी संबंधित असते. ते क्षणिक असते. याऊलट आनंद देण्यातून मिळतो. तो जगणे अर्थपूर्ण करतो. अंतरंगातून बाहेर येतो आणि समाधानाच्या भावनेत परिणत होतो, असे ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शारीर गरजांची पूर्तता, हाताला काम, भोवतालातील घटकांशी मधुर नातेसंबंध, यातून आनंदाची निर्मिती होते. तर सुख काल, समाज, व्यक्ती तसेच अपेक्षासापेक्ष असते. वृद्धत्व उलटणार्‍या दिवसागणिक नजीक येत असते, याऊलट ज्येष्ठत्व कमवावे लागते. ते कमावण्यासाठी आरोग्य सांभाळणे, प्रवास करणे, आवडती कला, छंद जोपासणे, नवी कौशल्ये समजून आत्मसात करणे या उपक्रमांतून ‘ब्रेन जिम” जाईन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

ज्येष्ठत्व मिळवण्यासाठी प्रतिसाद द्यायला शिकले पाहिजे. आपण नेहमी प्रतिक्रियात्मक जगतो. त्याऐवजी प्रतिसादात्मक जगले पाहिजे. ते आपल्याला अधिक मानवतावादी बनवते. कुतूहल, जिज्ञासा, नवे शिकण्याची वृत्ती ठेवल्यास आपण आऊटडेटेड होत नाही. मुख्य म्हणजे स्वतंत्र असा आणि घरातील इतरांचेही स्वातंत्र्य कसोशीने जपा. न मागता सल्ले देऊ नका. ज्येष्ठत्व ही रिले बॅटन आहे. वेळीच पुढच्या पिढीकडे सोपवून मोकळे राहा. देणे – घेणे, याच्यापलीकडे जा. तिथेच समुद्रतळासारखी अथांग शांती आणि समाधान भेटेल, असे त्यांनी सांगितले.

गौरी नातू यांनी काळाच्या ओघात वृद्धत्व बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवले. कुटुंबव्यवस्थेत बदल घडत आहेत आणि विभक्त कुटुंबांचा ज्येष्ठत्वावर परिणाम होत आहे. अनारोग्यावर भर न देता आपले अनुभव, परिपक्वता, कौशल्य, मैत्र यांना वाव देणारी कृतीशीलता आणि नवीन गोष्टी शिकत राहणे महत्त्वाचे असून निवारा सुखसोपान आणि मनमस्तिष्क की पाठशाला या उपक्रमांचा हाच गाभा असल्याचे त्या म्हणाल्या.

भाषांतरकार वैशाली व्यास यांनी भाषांतराची प्रक्रिया आनंददायी होती. त्यातून खूप शिकता आले. प्रत्येक जण वयोवृद्धत्वाकडे जाणार आहे, याचे भान देणारा आणि त्यासाठी स्वतःला अक्शन मोडवर नेणारा हा अनुभव होता, असे सांगितले.

गौरी साळवेकर यांनी आयुष्याचा उत्तरार्ध निरामय व सुखद करण्यासाठी स्वतः आधीपासून तयारी करायची असते, याची जाणीव या पुस्तकाने दिल्याचा उल्लेख केला.

डॉ. राजसी धारिया यांनी ज्येष्ठांसाठी कार्य करणारा उपक्रम चालवायचा, तर त्याचे सर्व पैलू समजून घेणे अगत्याचे वाटल्याने, हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले आणि मूळ इंग्रजीत असले, तरी मराठी भाषेत ते यावे, असे वाटल्याने त्यासाठी पुढाकार घेतला, अशी माहिती दिली. ओंकार दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply