Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ प्रदान!

पुणे : “पत्रकारांमधला हिंदू शोधणे कठीण; पण रवींद्र भोळे यांनी तो शोधला, याचे कौतुक आहे. खरंतर पत्रकारांना जाती-धर्माचे लेबल असता कामा नये. पत्रकाराने आपल्या लेखणीतून समाजातील सर्व घटकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. मात्र, आपण ज्या घटकांसाठी काम करत असतो, त्या घटकांनी आपल्या कार्याचे कौतुक केले तर त्याचे समाधान मानायचे असते,” असे परखड आणि विचारप्रवर्तक मत पत्रकार प्रतिक गंगणे यांनी व्यक्त केले.

‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारितेची भूमिका, तिचे सामाजिक उत्तरदायित्व आणि पत्रकाराच्या कार्याची ओळख यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्याने पुरस्कार सोहळ्यात विशेष लक्ष वेधले.

दैनिक आरंभ पर्वचे व्यवस्थापकीय संपादक तथा ‘पुणे प्रहार’चे संपादक प्रतिक गंगणे यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रतिक गंगणे यांनी पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांकडे लक्ष वेधले. पत्रकाराची ओळख ही त्याच्या जाती-धर्मावरून नव्हे, तर त्याच्या लेखणीतून समाजासाठी केलेल्या कामावरून व्हायला हवी, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. पत्रकाराने कोणत्याही एका समाजघटकापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांचे प्रश्न, वंचितांचे प्रश्न आणि समाजहिताचे विषय निर्भीडपणे मांडले पाहिजेत, ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी आयोजक डॉ. रवींद्र भोळे यांचे आभार मानले. पत्रकारांना कोणत्याही जाती-धर्माच्या चौकटीत न बसवता त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव होणे, हीदेखील महत्त्वाची बाब असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले.

अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यातील नवी पेठ येथील संकल्प बँक्वेट हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले रवींद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित या सोहळ्यात डॉ. पांडुरंग दगडू सराफ, ममता यशवंत पाटील, विजयमाला महादेव पवार, ज्योती नाळे, डॉ. स्मिता सहस्रबुद्धे यांच्यासह समाजसेवा, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, आरोग्य, कृषी, पर्यावरण, अध्यात्म आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

पत्रकार प्रतिक गंगणे यांच्या वक्तव्यामुळे पुरस्कार सोहळ्याला केवळ सन्मानाचे स्वरूप न राहता पत्रकारितेची धर्मनिरपेक्षता, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशकतेचा विचार अधोरेखित करणारा संदेशही मिळाला.

Leave a Reply