जरांगे यांना आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी
अनेक अटी शर्तींचे करावे लागणार पालन
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याच्या एक दिवस आधीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदान येथे आंदोलन करता येणार नाही, असा आदेश दिला होता. मात्र आता जरांगे पाटील यांना केवळ एक दिवस आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी अनेक अटी शर्तींचे पालन आंदोलकांना करावे लागणार आहे.
आंदोलनासाठी आंदोलकांना आझाद मैदानाच्या केवळ सात हजार चौरस मीटर जागेवर आंदोलन करण्यास परवानगी मिळणार आहे. या आंदोलनात केवळ 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी ठराविक संख्येने वाहने नेता येणार आहेत. वाहनतळा संबंधी वाहतूक पोलिसांची चर्चा करून निर्णय घेण्याची अट घालण्यात आली आहे. शनिवार, रविवार अथवा कोणत्याही शासकीय आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, अशा अटी परवानगी देताना घालण्यात आल्या आहेत.
न्यायालयाने आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मुंबईतील शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून त्यांच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याची हमी देत परवानगीसाठी नव्याने अर्ज सादर केला. त्यानंतर आंदोलनाला अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.
