Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘बालगणेशा’पासून ‘कुंडलिनी गणेशा’पर्यंतचा उलगडला प्रवास

डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा ‘गणेशमूर्ती’ विषयावर रंगला मास्टर क्लास

पुणे :  बालरूपातील गणेशमूर्तीपासून ते थेट तांत्रिक मार्गातील कुंडलिनी गणेशापर्यंतचा गणेशमूर्तींचा आश्चर्यकारक प्रवास ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डाॅ. गो. बं. देगलूरकर यांच्या कथनातून शनिवारी येथे उलगडला. स्थानिक, प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही गणेशमूर्ती कशा पोहोचल्या आहेत, याचीही माहिती जिज्ञासूंना यावेळी मिळाली. पुण्यातील इंडी हेरीटेज व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘गणेश मूर्ति’ या विषयवार व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी टीमवीच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभाग प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव, बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर व इंडी हेरीटेजचे समन्वयक तुषार जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

टीमवीच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्रात इंडॉलॉजी संबंधी पदविका अभ्यासक्रम सुरु होण्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत यावेळी डॉ. भालेराव यांचा डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डाॅ. देगलूरकर यांनी पारदर्शिकांच्या साह्याने गणेशमूर्तींचा प्रवास श्रोत्यांसमोर ठेवला. “कोणतीही देवता जेव्हा लोकमानसात स्थान मिळवते, तेव्हा देवतेची उपयोगिता महत्त्वाची मानून मूर्तींची निर्मिती केली जाते. गणेश ही देवताही याला अपवाद नाही. त्यामुळेच दोन हातांच्या, दोन मस्तकांच्या गणेशापासून ते २० हातांच्या गणेशमूर्तींपर्यंतचे वैविध्य दिसते”, असे ते म्हणाले.

“प्राचीन काळी गणेश ही देवता म्हणून प्रस्थापित झाली नव्हती. गणेश देवता म्हणून काहीसा उत्तरकालीन आहे. साधारणतः पाचव्या शतकापासून गणेशाच्या मूर्तींचा आढळ होतो. गणेश आणि मुद्गल पुराणांत गणेश या देवतेची विस्तृत माहिती आढळते”, असेही ते म्हणाले.

कल्याण येथील कुंडलिनी गणेशमूर्ती केवळ अद्भुत स्वरुपाची आहे. या मूर्तीची ओळख मुख्यत्वे चिन्हांवरून पटते. मूर्तीच्या पाठीवर सुस्पष्ट स्वरुपातील वेणी आढळते. योगमार्गातील इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन नाड्यांचे ती प्रतिनिधित्व करते. तिला शास्त्राधार आहे. योगोक्त षट्चक्रांची स्थानेही यात अभिप्रेत आहेत. मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा कुंडलिनीचा प्रवास, ही मूर्ती सूचित करते, असे डाॅ. देगलूरकर म्हणाले.

होट्टल येथील नृत्यगणेश, काबूल येथील महागणेशमूर्ती, पाटण येथील सहा मुखांचा गणेश, चिंदबरम् येथील बालगणेश, बंधू कार्तिकेयासोबतच्या गणेशमूर्ती, हेरंब गणेश (सिंहारूढ), पंचमुखी महागणपती, वाराणसीचा यक्षविनायक, पुण्यातील मयुरारूढ त्रिशुंड गणपती, अंबरनाथ व औंढ्या नागनाथ येथील उच्छिष्ट गणेश, दशहस्त गणेश तसेच तांत्रिक मार्गावरील गणेशमूर्ती आणि कल्याण येथील कुंडलिनी गणेश अशा विविध गणेशमूर्तींचे छायाचित्र आणि विवेचन, अशा क्रमाने डाॅ. देगलूरकर यांनी गणेशमूर्तीं उलगडून सांगितल्या. तसेच जपान, इंडोनेशिया, कंबोडिया या देशांतील गणेशमूर्तीही दाखवल्या.

डाॅ. मंजिरी भालेराव म्हणाल्या, “भारतीय विद्या म्हणजे इंडाॅलाॅजी या विषयाचे अभ्यासक्रम मराठी माध्यमात सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच ज्या अध्यापकांनी यासाठी मोलाचे योगदान दिले, त्या परंपरेचा हा सत्कार मी प्रातिनिधिक स्वरुपात स्वीकारते. पुण्याच्या मध्यवर्ती भागात भारतीय विद्या, पुरातत्त्वविद्या यांचे अभ्यासक्रम मराठी माध्यमातूनही उपलब्ध व्हावेत, ही ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डाॅ. ह. धी. सांकलिया यांची प्रेरणा होती. त्या सर्व स्मृतींचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, आपली संस्कृती, इतिहास, परंपरा यांचा व साधनांचा अभ्यास करता यावा, हाच उद्देश यामागे आहे”.

अनुश्री घिसाड यांनी परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading