दिव्यांगांसाठी सरकारी योजनांसोबत सामाजिक कारूण्य गरजेचे – धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन
पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणात दिव्यांगांसाठी वापरसुलभ व सर्वसमावेशी योजना आहेत. मात्र केवळ धोरण आखल्याने परिवर्तन होत नाही, त्यासाठी सामाजिक सजग कारूण्यभाव गरजेचा असतो. तरच सर्वांना संसाधने, संधी व सन्मान मिळतो. दीपस्तंभ फाउंडेशनचा मनोबल प्रकल्प याच कामाचे आदर्शरूप असल्याची भावना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली. दिल्लीत मनोबल प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे निशुल्क निवासी उच्च शिक्षण व प्रशिक्षण करणाऱ्या मनोबल प्रकल्पाचे उद्घाटन दिल्लीत संपन्न झाले. जळगाव व पुण्यापाठोपाठ यामुळे दिल्लीत मनोबल प्रकल्पाचा विस्तार झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कस्तुरबा गांधी रस्त्यावरील नवीन महाराष्ट्र सदनाच्या भव्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे, दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव राजेश अगरवाल, नवनामनिर्देशित राज्यसभा खासदार अॅड उज्वल निकम, भाजपचे केंद्रीय संघटन सचिव व्ही सतीश, माजी खासदार व आयसीसीआरचे माजी संचालक विनय सहस्रबुद्धे, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर व फाउंडेशनचे संस्थापक संचालक यजुर्वेंद्र महाजन यावेळी उपस्थित होते.
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच उच्च शिक्षणामध्ये यश संपादन करणारे दिव्यांग विद्यार्थी मनू गर्ग (आयएएस), रवि राज (आयआरएस), अश्विनी परकाळे (आयएपओएस), श्रीतेज पटेल (आयआरएमएस), संपदा वांगे, प्रणित गुप्ता (आयआयएम उदयपूर, तुषार चौगुले (एक्झक्युटीव्ह इंजिनिअर), माऊली अडकूर ,कविता देसले (एमपीएससी), राकेश गुहा (बँक), विशाल शेलार (सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक), वीणा (पीएसआय), प्रतीक जिंदाल (आयडीबीआय बँक) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
देशात २६ कोटी १० लाख शालेय विद्यार्थ्यांमध्ये २ कोटी १ लाख दिव्यांग आहेत. त्यांच्यासाठी काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग शब्द रूढ केला. अपंगत्वाला त्यांनी सन्मान दिला. मात्र दिव्यांग, अनाथ, ट्रांसजेंडर यांना संधी, संसाधने व समान वागणूक दिली तरच समता प्रस्थापित होईल. दीपस्तंभ फाउंडेशनचा मनोबल प्रकल्प याच भावनेने प्रेरित असल्याचे गौरवोद्गारही धर्मेंद्र प्रधान यांनी काढले.
प्रधान पुढे म्हणाले की, “मनोबल प्रकल्प सामाजिक संकल्प व राष्ट्र निर्माणातील अभूतपूर्व प्रयत्नांचे प्रतीक आहे. दिल्लीत मनोबल प्रकल्पाची उभारणी सर्वसमावेशकता, समानता व संधीचा प्रारंभ आहे. दिव्यांग, अनाथ, ट्रान्सडेंजर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. दीपस्तंभ फाउंडेशनप्रमाणे समर्पण भावाने समाजाने काम केले तरच २०४७ साली स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपण आदर्श समर्थ भारताची निर्मिती करू.”
यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, “समाजातल्या या सर्वांत गरजू विद्यार्थ्यांच्या विकासाची जबाबदारी शासन, प्रशासन व नागरिकांची आहे. त्यासाठी दीपस्तंभचे कार्य आदर्श व प्रेरणादायी असून सर्वांनी त्यात सहभागी व्हायला हवे.
राजेश अगरवाल म्हणाले, दिव्यांगांना गेल्या दहा वर्षात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव काम झाले आहे. स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारे, केंद्र सरकारचे विविध विभाग, खासगी क्षेत्रात दिव्यांग, अनाथ, ट्रांसजेंडर्स समूदायाकडे पाहण्याचा दृष्टीकेन बदलला आहे. समाजाची संवेदनशीलता यामुळे वाढते आहे. दिव्यांग, अनाथ, ट्रांसजेंडर्सना संस्थेत ममत्व व सर्वोत्तम प्रशिक्षण, शिक्षण मिळते. येथील विद्यार्थी केवळ यश मिळवत नाही तर चांगला माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो. कौटुंबिक स्नेह व सर्व नात्यांचे प्रेम या विद्यार्थ्यांना मनोबलमलमध्ये मिळते. त्यामुळे त्यांच्यात स्व-प्रतिष्ठा निर्माण होते. दिव्यांग कल्याणमध्ये नियम नव्हे तर मनापासून काम करणे त्यासाठीच महत्त्वाचे असते. दिव्यांग धोरणासाठी सार्वजनिक संवेदनशीलता अशावेळी गरजेची ठरते. दिव्यांगांना खासगी क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध व्हायला हव्यात, असेही अगरवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या निवासी शिक्षण प्रशिक्षणासाठी योगदान देणाऱ्या एनएचपीसी, डोनाल्डसन फिल्टरेशन, परफेटी या कंपन्यांचा तसेच देणगीदारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. उदय निरगुडकर यांचेही यावेळी भाषण झाले. ज्येष्ठ विधज्ज्ञ व नवनियुक्त राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेची विद्यार्थीनी माऊली अडकूर हिने हार्मोनियमवर ‘सारे जहां से अच्छा हे…’ गीत सादर केले. सूत्रसंचालन दिव्यांग विद्यार्थी सलमान व निशिता यांनी केले दिव्यांग विद्यार्थी मुबशीर याने आभार व्यक्त केले.
