Thursday, June 4, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

अडोर संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राद्वारे होतीये रुग्णांना मदत

ज्येष्ठ मधुमेह उपचार तज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची माहिती

पुणे  : दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून नागरिकांना वजन कमी करण्यासाठी आणि औषधांवाचून मधुमेहावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पुण्यातील अडोर (असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल) संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राद्वारे आजवर ३,५०० रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी नावनोंदणी केली असून सहा महिन्यात रुग्णांचे वजन हे सरासरी ६.२ किलो कमी झाले आहे. यापैकी  ३,००० रुग्ण हे पुणे शहर आणि परिसरातील आहेत. याबरोबरच सुमारे ३९८ मधुमेही रुग्णांचे एचबीएवनसी किमान तीन महिन्यांपासून औषधे बंद होऊन ६.५ पेक्षा कमी झाले असून यामध्ये पुणे परिसरातील ३६५ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती ज्येष्ठ मधुमेह उपचार तज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिली आहे. आजवर देश परदेशातील लाखो रुग्णांना दीक्षित आहारपद्धतीचा फायदा झाले असल्याचेही आज झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दीक्षित म्हणाले. संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब कदम, डॉ. जयंत नवरंगे, डॉ जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. वेदा नलावडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

अडोर संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राद्वारे रुग्णांना अनेक पातळ्यांवर मदत होत असून या केंद्रात सल्ला घेणाऱ्या एचबीएवनसी दहा पेक्षा जास्त असणाऱ्या किमान ३५ ते ४० रुग्णांचा मधुमेह औषधांवाचून नियंत्रणात आला आहे व दीक्षित जीवनशैली अंगिकारल्याने ४ रुग्णांचे तंबाखूचे व्यसन सुटले असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

संभाजी पार्क समोर, जंगली महाराज रस्ता येथे कार्यरत असलेले अडोरचे पुण्यातील केंद्र रुग्णांच्या सोयीसाठी आता लॉ कॉलेज रत्यावर नळ स्टॉप येथील अपेक्स कॉलनीमध्ये महिंद्रा उन्नती शोरूमच्या वर या प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. सदर जागा राम पद्मा गोडबोले फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर केंद्र सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५ ते ९ या वेळात चालू असेल. तसेच या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्या व समुपदेशन या सेवा पूर्णतः निशुल्क असतील, अशी माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली. अडोर’च्या या समाजोपयोगी कामात यंदा देखील इन्फोसिस फाउंडेशन तर्फे आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

याविषयीची अधिक माहिती देताना डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, जगभरात मधुमेहाच्या रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील असा सल्ला दिला जात असताना आमच्या केंद्रात टाइप २ मधुमेह हा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होणारा आजार असल्याने तो दीक्षित जीवनशैली द्वारे जीवनशैली सुधारून औषधांवाचून नियंत्रणात आणता येतो असा आश्वासक सल्ला दिला जातो. खरे तर मधुमेहाच्या उपचारात घडणारी ही क्रांती आहे असेच म्हणता येईल. दिवसातून फक्त दोनदा जेवणे आणि ४५ मिनिटे व्यायाम करणे या साध्या सोप्या दीक्षित जीवनशैलीने अनेक वर्षांचा मधुमेह औषधांवाचून नियंत्रणात येतो असा अनुभव अनेक रुग्णांनी घेतला आहे. मुख्य म्हणजे ही जीवनशैली मोफत आहे. त्यासाठी कोणतेही विशेष अन्नपदार्थ, पोषक घटक, उपकरणे किंवा कोणत्या तज्ज्ञाची मदत लागत नाही आणि आयुष्यभर तिचा आनंदाने अंगीकार करता येतो.

इन्फोसिस फाउंडेशन या संस्थेच्या आर्थिक सहाय्याने नोव्हेंबर- डिसेंबर २०२२ रोजी अनुक्रमे पुणे व नागपूर येथे असोसिएशन फॉर डायबेटीस अंड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) तर्फे ‘इन्फोसिस फाउंडेशन डायबेटीस केअर प्रोग्राम’ या नावाने मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्रे सुरु करण्यात आली. नाशिक येथे सीटीआर कंपनीच्या आर्थिक सहाय्याने केंद्र सुरु असून तेही दररोज चालू असते. या शिवाय अडोर तर्फे ठाणे, कल्याण, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, विले पार्ले, सूरत, बेळगाव आणि मडगाव येथे केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे आठवड्यातून एक दिवस किंवा काही ठिकाणी ३ दिवस चालू असतात. नुकतेच बदलापूर व भायंदर येथेही हे केंद्र सुरु झाले असल्याची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.

मधुमेह मुक्ती केंद्रातील रुग्ण माहितीच्या आधारे आजवर अनेक शोध निबंध प्रकाशित झाले असून त्यातील इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२३ ला प्रकाशित झालेल्या शोध निबंधाला त्या वर्षी त्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला ‘सर्वोत्कृष्ट शोध निबंध’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मधुमेहाची गंभीर समस्या लक्षात घेता अशी केंद्रे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक शहरात स्थापन करण्याचे नियोजन असून यासाठी स्वयंसेवी संस्था व कंपन्यांचे सहाय्य मिळणे गरजेचे आहे. लोकसहभागातून हे केंद्र पुढे चालावे यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत असेही डॉ. दीक्षित यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading