“निष्काम कर्मयोगीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काकासाहेब चितळे” विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांचे गौरवोद्गार
पुणे : “काकासाहेब चितळे यांनी कृष्णाकाठी असलेल्या भिलवडीसारख्या ठिकाणी गोकुळ निर्माण केले. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाप्रमाणे अनासक्ती मनात ठेवून, त्यांनी आयुष्यभर कार्य केले. काकासाहेब हे खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी त्यांच्याकडे जे काही ज्ञान होते ते निःस्पृहपणे समाजामध्ये वाटून टाकले. ‘चितळे’ या नावाबद्दल प्रत्येक मराठीला माणसाला आस्था आणि प्रेम आहे. चितळे कुटुंबीयांनी आपला व्यवसाय मोठा केलाच; मात्र आपल्याबरोबरच्या समाजालाही त्यांनी मोठे केले.” असे गौरवोद्गार ज्येष्ठ व्याख्याते विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काढले.
‘काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे’ या दत्तात्रय ऊर्फ काकासाहेब चितळे यांच्या वसुंधरा काशीकर लिखित प्रेरणारूपी चरित्राचे प्रकाशन विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. काकासाहेब चितळे फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, काकासाहेब चितळे यांच्या पत्नी सुनीता चितळे, पुत्र गिरीश चितळे, मकरंद चितळे यांच्यासह वीणा सहस्रबुद्धे, शेखर सहस्रबुद्धे, श्रीपाद चितळे, श्रीकृष्ण चितळे, भक्ती चितळे, लीना चितळे आदी चितळे कुटुंबातील सदस्य तसेच आमदार डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.
गिरीश चितळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “हा केवळ चरित्रग्रंथ नसून, एक जीवनदृष्टी देणारा प्रेरणा ग्रंथ आहे, असे मी मानतो. सामान्य आयुष्य जगलेल्या असामान्य माणसाचे असंख्य पैलू शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकातून केला आहे. काकासाहेब चितळे हे केवळ एका उद्योग समूहाचे प्रमुख नाही तर ते एका विचार पद्धतीचे प्रतिनिधी आहेत. काकासाहेब हे सर्वांसाठी संप्रेरक म्हणजेच कॅटॅलीस्ट होते आणि त्यांनी त्यांच्या कृतीतून दिलेले जीवनाचे धडे हे आमच्यासाठी निश्चितच शाश्वत आहेत.”
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “काकासाहेब हे उद्योजकांचे खरे खुरे आयडॉल आहेत. काळापुढे जाऊन आपली ध्येय्यधोरणे निश्चित करतानाच नीतिमत्ता, गुणवत्ता आणि ग्राहक हित, या तीन वैशिष्ट्यांमध्ये चितळे कुटुंबाच्या यशाचे गमक सामावले आहे. व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांमधून समाजाचे चारित्र्य घडत असते, त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे आहे.”
“या पुस्तकातून आपल्याला जगण्याचे प्रयोजन सापडेल. हे पुस्तक लिहिताना माझा परकाया प्रवेश झाल्यासारखं मला वाटत होतं, माझ्या जाणिवांचा विस्तार झाला आणि माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला हे पुस्तक लिहिताना मिळाली तशीच वाचकांना सुद्धा त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हा प्रेरणा ग्रंथ वाचताना मिळतील याची खात्री वाटते. करुणेला व्यवहाराची झालर लावून लोककल्याण साधता येऊ शकते, याची जाणीव या पुस्तकातून वाचकांना नक्कीच होईल आणि आपल्या संवेदनांचा समुद्र पुन्हा वाहण्यासाठी निश्चितच मदत होईल.” अशी भावना लेखिका वसुंधरा काशीकर यांनी व्यक्त केली.
काकासाहेब चितळे यांनी दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शिक्षण, सहकार, वाचनसंस्कृती, ग्रामीण उद्योग, शेतीमाल निर्यात, सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेकविध क्षेत्रात चतुरस्त्र योगदान केले. शिस्त, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपत समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम केले. त्यांचे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व विविध वक्त्यांच्या मनोगतातून उलगडले. या सोहळ्याला मोठ्या जनसमुदायासोबत शेखर गायकवाड, गोविंदराव कुलकर्णी, विसु भाऊ बापट, आम. विश्वजित कदम, संग्राम देशमुख व जायंट्स ग्रूपचे सर्व परिसरातील मान्यवर, भिलवडी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ, दूध उत्पादक, सप्लायर, बँक, इन्शुरन्सचे अधिकारी अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विघ्नेश जोशी यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रकाशन सोहळ्यात रंग भरले तर प्रसिद्ध शास्त्रिय गायिका मंजूषा पाटील-कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘परब्रह्म निष्काम तो हा’ या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.
