‘कामगार हा भुर्दंड नव्हे, तर देशाची सर्वात मोठी गुंतवणूक’ : ज्योती सावर्डेकर
पुणे : प्रतिनिधी
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी भारतीय श्रमिकाला ठेवणे आवश्यक आहे. कामगार हा भुर्दंड नसून देशाची सर्वात मोठी गुंतवणूक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी केले.
देशात पायाभूत सुविधा, उद्योग आणि तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि रोबोटिक्समुळे रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीत कामगारांना केवळ रोजगार देणे पुरेसे नसून त्यांना सतत रोजगारक्षम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे सावर्डेकर यांनी सांगितले.
कामगार संघटनांची भूमिका केवळ मागण्या मांडण्यापुरती मर्यादित न राहता ज्ञान, कौशल्यविकास, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तन घडविणारी असली पाहिजे. कामगारांना कौशल्यविकास, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य, आर्थिक साक्षरता, डिजिटल सक्षमता आणि कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाच्या संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
उद्योग आणि कामगार हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून विकासाचे समान भागीदार आहेत. एकाशिवाय दुसऱ्याचा विकास शक्य नाही. त्यामुळे भविष्यातील कामगार चळवळीने हक्कांसाठी संघर्ष करतानाच सहकार्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे आणि समस्यांसोबत उपाययोजनाही मांडल्या पाहिजेत, असे सावर्डेकर म्हणाल्या.
विकसित भारताचा मार्ग केवळ मोठ्या शहरांतून नव्हे, तर देशातील प्रत्येक कारखाना, शेत, बांधकामस्थळ आणि श्रमिकाच्या हातातून जातो. भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर भारतीय कामगाराला सशक्त, सुरक्षित, कौशल्यसंपन्न आणि सन्मानित करणे आवश्यक आहे. राष्ट्राची खरी उंची त्याच्या इमारतींनी नव्हे, तर त्या उभारणाऱ्या श्रमिकांच्या सन्मानाने मोजली जाते, असे त्यांनी सांगितले.
